आजी आजोबांच्या जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
आचरा प्रतिनिधी
जि.प. पूर्ण प्राथमिक तोंडवळी वरची या शाळेमध्ये आजी -आजोबा दिवस हा कार्यक्रम संपन्न झाला.सध्या कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते.आजी आजोबांचा नातवंडांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्त्वपूर्ण असून हे नातं पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी आहे.हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तोंडवळी वरची शाळेत आजी -आजोबा दिवस हा उपक्रम घेण्यात आला.
तोंडवळी गावचे सरपंच नेहा तोंडवळकर व उपसरपंच हर्षद पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आजी आजोबांसाठी मेणबत्ती पेटविणे, बादलीत चेंडू टाकणे, फुगे फुगविणे व संगीत खुर्ची असे विविध खेळ घेण्यात आले. यातून आजी आजोबांना साठ सत्तर वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देता आला. रिमा पाटील यांनी आजीचा बटवा, संस्कारक्षम गोष्ट, नाटुकले यांचे सादरीकरण केले. तुकाराम कांदळकर यांनी अभंगातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लीलावती चव्हाण, वनिता गोलतकर, तिलोत्तमा हडकर यांनी गीत सादर केले. तर कमलाकर सारंग यांनी संत नामदेव यांनी उत्तम सादरीकरण केले.









