वार्ताहर /कडोली
गेल्या अनेक वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ परंपरा जपत आलेल्या जाफरवाडी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षापासून शाळकरी मुलांना वहय़ांचे वाटप करून फटाकेविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
तालुक्यात आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱया जाफरवाडी गावाने एक जुटीचे दर्शन घडवून अनेक उपक्रम राबविले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या गावाने ‘एक गाव एक गणपती’ परंपरा जपली आहे. कोणतेही हेवेदावे न करता हा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करतात. यावर्षापासून या मंडळाने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदुषणचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय फटाक्यांचे दरही गगनाला भिडले आहेत.
फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेऊन जाफरवाडीतील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाकेविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन त्या मोबदल्यात शाळकरी मुलांना वहय़ांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते श्रीनाथ पाटील, नंदू पाटील, भरमा बेळगावकर, बंडू बेळगावकर, महेश मुतगेकर, राहुल पाटील, कल्लाप्पा टक्केकर आदी उपस्थित होते.









