
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे योग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी होते. त्यांनी योगामुळे तणाव दूर होऊन नकारात्मकतेपासून सृजनशीलतेकडे आपण जावू शकतो, असे सांगितले.

योग प्रशिक्षक डॉ. अभय केस्ते आणि उषा केस्ते यांनी योगासनांची प्रात्यक्षिके त्यांचे फायदे सांगितले. या निमित्ताने आयोजित प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना ब्रिगेडिअर जॉयदीप यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. भारतीय सेनेने तणाव मुक्तीसाठी व शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग सराव सुरू ठेवला आहे. दररोज सकाळी व्यायामाचा भाग म्हणून योग सराव केला जातो. सैनिकांना अनेकवेळा उंच ठिकाणी आणि कठीण हवामान असणाऱया वातावरणात काम करावे लागते. त्या ठिकाणी येणारा मानसिक तणाव, वाढणारा रक्तदाब यावर नियंत्रण आणण्यासाठी योगासनांचा उपयोग होतो. यासाठी सैनिकांना योगसाधना शिकविली जाते.
वननेस योगा
वननेस योगातर्फे सदाशिवनगर येथील ध्यान मंदिरमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. गेला आठवडाभर ऑनलाईन पद्धतीने जगभर साधकांसाठी योग वर्ग घेण्यात आला. त्याची सांगता योग दिनादिवशी झाली. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आनंद यासाठी योग महत्त्वाचा आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सांबरा विमानतळ
सांबरा विमानतळावर पतंजली योगपीठातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी श्रेणीक घोडावत व विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पतंजलीतर्फे किरण मन्नोळकर यांनी योगामुळे शरीर स्वास्थ्य लाभते, मनोबल वाढते व आध्यात्मिक स्तर उंचावतो. अष्टांग योग साधनेमुळे जीवनामध्ये समाधान लाभते, असे सांगितले.
हरिद्वारहून आलेल्या साध्वी देवपवित्रा व देवपूर्णा यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून योग आणि योग्य आहाराचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी किरण टी., प्रताप देसाई, महेंद्र साळवी, अमरेंद्र कानगो, शंकर कुदी उपस्थित होते.
कित्तूर येथे योग दिन साजरा
कित्तूर येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत आठवा योग दिन देशातील 75 ऐतिहासिक स्थळांवर साजरा करण्यात आला. यामध्ये राज्यातील पाच जिल्हय़ांपैकी बेळगावातील कित्तूर गावचा समावेश होता. योगदिनी पतंजली योगपीठ व आयुष मंत्रालय बेळगाव विभाग यांच्या सहकार्याने भव्य प्रमाणात योग दिन साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मडिवाळ राजयोगेंद्रस्वामी, श्री पंचाक्षरी स्वामी, साध्वी देवपवित्र, साध्वी देवपूर्णा, महिला राज्य प्रभारी आरती कानगो, आमदार महांतेश दोड्डगौडर, बैलहोंगलचे उपायुक्त शशीधर बगली, तहसीलदार सोमलिंगप्पा हुलजी, बीईओ रविंद बळीगार, पतंजलीचे बेळगाव प्रभारी किरण मन्नोळकर आदी उपस्थित होते. यावेळी साध्वांनी उपस्थित हजारो विद्यार्थी आणि नागरिकांकडून प्रात्यक्षिके करून घेतली.
केंद्रीय विद्यालय नं. 2 मध्ये योग महोत्सव उत्साहात
केंद्रीय विद्यालय नं. 2, बेळगावमध्ये 7 दिवसांचा योग महोत्सव उत्साहाने पार पडला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी शाळेत योगाचा इतिहास, त्याचे महत्त्व, मूलभूत आसने आणि सन्मान्य व्यक्तींनी योगामध्ये आणलेले काही बदल या विषयीची कार्यशाळा झाली.
16 जून 2022 रोजी शाळेचे योग शिक्षक मोहन गावडे यांनी प्राणायाम आणि श्वासाच्या इतर व्यायामांचे प्रात्यक्षिक दाखविले. यामध्ये मोठय़ा संख्येने कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 17 जून 2022 रोजी शाळेच्या आवारात विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाने सूर्यनमस्कार घातले. 18 जून रोजी शाळेत पोस्टर बनवायची स्पर्धा घेतली गेली. यामध्ये 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी 3 गटांमध्ये भाग घेतला. गट अ चौथी, गट ब 6 वी ते 8 वी, गट क 9 वी ते 12 वी. 19 जून रोजी परीक्षा पूर्वी, परीक्षेच्या काळात, कार्यालयात कोविड 19 काळात येणाऱया ताणाला सामोरे जाण्यासाठी कोणती योगासने करणे उपयोगाची आहेत हे योग शिक्षक मोहन गावडे यांनी सांगितले.
20 जून रोजी शरीरावर आणि मनावर संगीताचा प्रभाव कसा पडतो, याबद्दल सांगून मोहन गावडे यांनी संगीताबरोबर योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवली.
21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेच्या आवारात प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक योगा केले. यानंतर योग नृत्य, योग पिरॅमिड, डय़ुएट आणि सोलो योग व्यायामांचे प्रदर्शन झाले. शाळेचे मुख्याध्यापक अरुण कुमार यांनी कार्यक्रमाच्या शेवटी योगाचे महत्त्व सांगणारे भाषण केले.









