प्रतिनिधी /म्हापसा
पारंपरिक भाताच्या कणसाची पूजा (नवे) करून उत्सवाला सुरुवात झाली. नव्याने आलेल्या कणसाची भक्तगणांनी शेतात विधिवत पूजा करून ती कणसे घरी आणण्यात आली व श्रीगणेशासमोर ठेवून त्यांची पूजा करून कणसे दारावर बांधण्यात आली.
नव्याने भात कणसे काढून त्याची पूजा करण्याची बार्देशमध्ये परंपरा आहे. त्या पद्धतीने भक्तगणांनी यंदाही पूजा केली. काणका येथील रवींद्र तुळशीदास गडेकर म्हणाले की, आम्ही दरवर्षी काणका गावात कणसाची पूजा करीत होतो. मात्र यंदा या भागात कुणी शेती न केल्याने आम्हाला साळगाव गावात जावे लागले. विनेश मेघश्याम साळगावकर म्हणाले की, या भागात यंदा पीक न आल्याने आपण गिरी भागात जाऊन कणसाची पूजा करून घरी आणले. प्रभाकर मांद्रेकर म्हणाले की, गणपतीच्या दुसऱया दिवशी आम्ही घरी कणसे आणून त्याची विधीवत पूजा करतो. यंदा काणका भागात शेती लागवड न केल्याने आम्हाला साळगावच्या दिशेने जावे लागले. मात्र गणरायाच्या कृपेने आम्हाला खूप कणसे मिळाली. पर्रा येथील श्रीकृष्ण आराबेकर, स्वप्नील आराबेकर, विठ्ठल वेंगुर्लेकर आदींनी आपले विचार व्यक्त केले.









