बैलहोंगल विभागाचे उपअधीक्षक विरय्या हिरेमठ यांचे आवाहन
खानापूर : शिवजयंती आणि बसवजयंती शांततेत, उत्साहात तसेच शासनाच्या मार्गसुचीनुसार पार पाडा.सामाजिक भान जपून शिवचरित्रातील देखाव्यांचे वेळेत सादरीकरण करा, जेणेकरुन शिवप्रेमी नागरिकांना याचा आनंद घेता येईल. बसव जयंतीही शांततेत आणि सौहार्दच्या वातावरणात पार पाडा, पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असे आवाहन बैलहोंगल विभागाचे उपअधीक्षक विरय्या हिरेमठ यांनी खानापूर पोलीस स्थानकात आयोजित शांतता सभेत बोलताना व्यक्त केले. उपनिरीक्षक एन. डी. बिरादार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. व्यासपीठावर नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर उपस्थित होत्या. तसेच नव्याने रुजू झालेल्या उपअधीक्षक विरय्या हिरेमठ यांचे खानापूर पोलीस स्थानकांतर्फे स्वागत केले. शहरात 29 एप्रिल रोजी शिवजयंती, 30 रोजी बसवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
त्या दृष्टीने शांतता समितीची बैठक खानापूर पोलीस स्थानकात आयोजित केली होती. यावेळी खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गवंडी यांनी शिवजयंती, बसवजयंती शांततेत, सौहार्दच्या वातावरणात पार पाडा तसेच ठरलेल्या मार्गावरुन मिरवणूक काढण्याचे आवाहन केले. मिरवणुकीत डिजेचा वापर अजिबात करू नये, विद्युत वाहिन्यांबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, कार्यकर्त्यांनी आपापल्या मंडळाची योग्य ती जबाबदारी घेऊन शिवजयंती चित्ररथाची मिरवणूक वेळेत काढावी, असे आवाहन केले. यावेळी संजय कुबल यांनी शिवजयंती, बसवजयंती खानापूरच्या परंपरेप्रमाणे पार पाडण्यात येईल, असे सांगितले. प्रकाश चव्हाण, तोईद चांदकन्नावर, गुड्डसाब टेकडी, प्रकाश बैलूरकर, रवि काडगी, गुंडू तोपिनकट्टी यांनी सूचना मांडल्या. नव्याने बैलहोंगल विभागाच्या उपअधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारलेले विरय्या हिरेमठ यांचा खानापूर शहर तसेच इतर संघटनांतर्फेही स्वागत केले.









