शिराळा(सांगली)- शिराळा येथील नागपंचमीच्या मंडळांनी कायद्याचे पालन करुन नागपंचमी साजरी करावी असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले. ते शिराळा येथील तहसील कार्यालयात नागपंचमी निमित्त आयोजित मिटींगमध्ये बोलत होते.यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मुख्याधिकारी योगेश पाटील आदींसह नागमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, मिरवणूकीसाठी वाहनांचा वापर योग्य पद्धतीने कमी करावा. हायकोर्टाच्या नियमानुसार वाद्यांचा वापर करून ध्वनिप्रदूषण टाळावे. मंडळांनी कायद्याचे पालन काटेकोरपणे व तंतोतंत करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल. नागमंडळाच्या मिरवणूकीत वापरली जाणारी वाहनांची नोंदणी तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य यांची पोलीस ठाण्यात करून अगोदरच मिरवणूक परवाणा घ्यावा. कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची दक्षता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. वनक्षेत्रपाल सचिन जाधव म्हणाले, शिराळा गावची नागपंचमी ही श्रध्देची जुनी परंपरा आहे.ही परंपरा श्रध्देपुरती मर्यादित ठेवावी. नागपंचमी निमित्त जिवंत नाग पकडू नयेत. स्पर्धा वैगेरे घेऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले, नागपंचमी दिवशी मिरवणूक काढताना दक्षता घ्यावी कायद्यांच्या नियमानुसार वाद्यांचा वापर करावा.तसेच नागपंचमी सण भक्तीमय व भावनीक वातावरणात साजरा करावा.पार्किंग व्यवस्थाचे नियोजन करण्यात आले असून सदर मिरवणूकीवर सीसीटीव्हीचा वाॅच असणार आहे. मिरवणूक योग्य मार्गावरुन शांततेत पार पाडावी. ही सर्वस्वी जबाबदारी नागमंडळांची आहे. तसेच जी वाहने मिरवणूकीसाठी वापरली जाणार आहेत. त्याची कागदपत्रे क्लिअर असने अत्यंत गरजेचे आहेच शिवाय वाहनधारकांना वाहन चालवण्याचा परवाना बंधनकारक राहील. सदर वाहनांची तसेच ड्रायव्हरच्या वाहन परवान्याची नोंद पोलीस ठाण्यात केलेली असावी.
तर मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, नागपंचमी मंगळवार दिनांक दोन रोजी असल्याने सोमवारचा आठवडी बाजार रविवारी भरवण्यात येणार आहे. नागरीकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. मिरवणूक मार्गावर स्टाॅल बसवू नये. सर्व नाग मंडळांनी मिरवणूक मार्गावर सहकार्य करावे.या बैठकीस प्रहारचे बंटी नांगरे, वैभव गायकवाड, नितीन निकम, सुमित निकम, अविनाश खोत, वसंत कांबळे, फिरोज मुजावर, देवा कांबळे, ओंकार गायकवाड, नजिर दिवाण, महेश घोडे, रोहित क्षिरसागर, आदी उपस्थित होते.
-प्रितम निकम, शिराळा