शांतता समितीच्या बैठकीत आवाहन : सर्वत्र कडक बंदोबस्त राहणार
वार्ताहर /कडोली
येथील दसरा उत्सवात हुल्लडबाजी आणि गैरप्रकार वगळून तरुण कार्यकर्त्यांनी यात्रोत्सव उत्साहात साजरा करावा. यात्रोत्सवावर सीसीटीव्हीची नजर आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार असल्याचे काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर यांनी सांगितले. विजयादशमीनिमित्त कडोली येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री कलमेश्वर देवालयाचा यात्रोत्सव भव्य प्रमाणात साजरा होतो. या पार्श्वभूमीवर कडोली ग्रा. पं.कार्यालयात ग्रा. पं. काकती पोलिस ठाणे, युवक मंडळे यांची शांतता समितीची बैठक पार पडली. बैठकीत पोलिस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर बोलत होते. त्यांनी पुढे सांगितले की, कडोलीचा दसरा उत्सव ऐतिहासिक पद्धतीने साजरा केला जातो. या महोत्सवाचे महत्त्व असेच अबाधित राहण्यासाठी तरुणांनी जबाबदारी ओळखून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे सांगितले. उपनिरीक्षक मंजुनाथ म्हणाले की, युवक मंडळांनी रितसर परवानगी घेऊन मर्यादित आवाजातच डॉल्बीचा वापर करावा, मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ता.पं. माजी सदस्य उदय सिद्दण्णावर, डॉ. विनोद पाटील यांनी विचार मांडले. देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धनंजय कटांबळे यांनी धार्मिक विधी व्यवस्थित पार पाडाव्यात, अशी विनंती केली. यावेळी गौडाप्पा पाटील, राजू मायाण्णा, राजु कुट्रे, दत्ता सुतार, संजय कांबळे, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.









