खडेबाजार पोलीस स्थानकात शांतता समितीच्या बैठकीत आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रविवारी येथील खडेबाजार पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली. ईद गांभीर्याने व शांततेत साजरी करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही परिस्थितीत अप्रिय घटनांना थारा देऊ नये, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी अधिकाऱ्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. सदस्यांनी आपले म्हणणे मांडले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने व शांततेत ईद साजरी करण्याचे आवाहन केले.
बकरी ईदच्या काळात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध रहावे. अनेक अप्रिय घटनांना अफवाच कारणीभूत ठरतात. अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनीही अफवा पसरविणाऱ्यांबद्दल पोलीस दलाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.









