युक्रेन आणि रशिया यांनी मानवतेच्या तत्वावर चार दिवस युद्धबंदी करावी, अशी सूचना संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गट्रेस यांनी केली आहे. दोन्ही देश या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा आपल्याला आहे, असे विधान त्यांनी विविध वृत्तसंस्थांशी बोलताना केले. ख्रिश्चनांचा ईस्टर हा सण पूर्ण होईपर्यंत तरी युद्धबंदी करा, असे आवाहन त्यांनी केले.
या चार दिवसांमध्ये युक्रेन सोडू इच्छिणाऱया नागरीकांना सुरक्षिरित्या दुसऱया देशांमध्ये जाता येईल. तसेच या देशातील नागरीकांना मानवता साहाय्य पाठविणे शक्य होईल. सध्या युक्रेनमध्ये अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी पुरेशा प्रमाणात अन्नधान्ये तेथे पाठविण्याची आवश्यकता आहे. यासाठी दोन्ही देशांनी युद्धबंदी निदान काही काळासाठी तरी करावी. युक्रेनच्या नागरीकांना औषधांचीही मोठी आवश्यकता आहे. विश्वसमुदायाने ही आवश्यकता उदारहस्ते औषधे पुरवून पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.









