लोणंद :
लोणंद रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अखेर सुरू झाले असून, यामागे ‘तरुण भारत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा आहे. स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा प्रवाशांनी, स्थानिक नागरिकांनी आणि प्रतिनिधींनी उपस्थित केला होता. त्यानंतर ‘तरुण भारत’ने हा विषय गंभीरतेने उचलून धरत बातम्या प्रसिद्ध बातम्या प्रसिद्ध केल्या आणि प्रशासनाचे लक्ष वेधले. लोणंद स्टेशन आता ‘जंक्शन’मध्ये असून, येथून प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची बनली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले असून, स्टेशन परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा फिक्सिंग व वायरिंगचे काम सुरू आहे.
स्थानिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे एक स्वागतार्ह पाऊल असून, यामुळे प्रवाशांच्या हालचालींवर चोख नजर ठेवता येणार आहे. यासोबतच गुन्हेगारी घटनांना आळा बसण्यास मदत होईल. प्रशासनाकडून प्रतिसाद : रेल्वे प्रशासनाने देखील ही गरज ओळखून तातडीने पावले उचलल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. स्थानिक सामाजिक संघटनांनी व प्रवासी संघटनांनी याला पाठिंबा दर्शवला असून, भविष्यात आणखी सुरक्षा यंत्रणांची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जनतेचा आवाज ‘तरुण भारत’
‘तरुण भारत’च्या सकारात्मक पत्रकारितेमुळे लोणंद रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणेचे काम सुरू होणे ही एक मोठी उपलब्धी ठरली आहे. ही घडामोड म्हणजे जनतेचा आवाज आणि पत्रकारितेचे सामर्थ्याचे उदाहरण – कय्युम मुल्ला, साथ प्रतिष्ठान लोणंद.








