सातारा :
सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार जिह्यातील सर्वच शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक यांना लोकसहभाग, सीएसआर, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. पहिल्याच दिवसापासून जिह्यातील 2700 शाळांपैकी 1988 शाळा सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्या आहेत. दरम्यान, सर्व जोडलेल्या शाळांवर थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून वॉच राहणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सर्व शाळांवर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिली होती. त्यानुसार जिह्यातील अकरा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींना तसेच शाळा व्यवस्थापन समितीला तसे पत्र लिहून सूचित केले होते. त्यानुसार जिह्यातील सुमारे 1988 शाळांमध्ये उन्हाळ्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. 2700 पैकी 1988 शाळांमध्ये यंत्रणा बसवण्यात आल्याने तसेच सीसीटीव्ही कॅमेरा हा 360 डिग्रीचा असून त्या कॅमेऱ्याद्वारे थेट जिल्हा परिषदेतून नजर राहणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांच्या मोबाईलवरही शाळेचा परिसर दिसणार आहे. माण, जावली, खंडाळा हे तीन तालुके 100 टक्के झाले असून, ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांचे लक्ष आहे.
- तीन वेळा हजेरी शिक्षकांची होणार
शिक्षक शाळेवर नसतात, ते अध्यापनाचे काम करत नसतात, इतर ठिकाणी कामानिमित्त जात असतात, अशा तक्रारी झाल्याने शासनाच्या वतीनेच शिक्षकांची दिवसांतून तीन वेळा ऑनलाईन हजेरी घेण्याची यंत्रणा करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. तसेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांचीही हजेरी घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यामध्ये व्हीएसके पोर्टल ही प्रणाली असून त्याचे प्रशिक्षणही शिक्षकांना लवकरच शिक्षण विभाग देणार असल्याचे समजते.
- सातारा जिह्यात झेडपीच्या 276 सेमी इंग्रजी शाळा
सातारा जिह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने 276 सेमी इंग्रजी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर पाचवी आणि आठवीच्या 113 प्रस्तावांना यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मंजुरी दिली आहे.








