अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून खबरदारीची उपाययोजना राबविण्यात येत आहे. अधिवेशन काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चे व आंदोलने होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षा यंत्रणेवर भर देण्यात आला आहे. अधिवेशन काळात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांकडून आंदोलने केली जातात. या दरम्यान सुवर्णविधानसौध यासह जिल्हाधिकारी कार्यालयावरही आंदोलने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करणे भाग पडले आहे. यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेंरे बसविण्यात येत आहेत. या दरम्यान येणाऱ्या मोर्चेकऱ्यांवर व रोजच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सदर सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगी ठरणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सरकारी कार्यालयांच्या आवारामध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. विशेष करून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात येणाऱ्या मोर्चांची संख्या अधिक आहे. तसेच या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. त्या दृष्टीनेही सुरक्षेची दखल घेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.









