कोल्हापूर :
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बाबीची गंभीर दखल घेऊन शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने ऑगस्ट 2024 मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिह्यातील सर्व माध्यमिक शाळा सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्या आहेत. तर जि.प.च्या 1964 प्राथमिक शाळांपैकी 1038 शाळांमध्ये सीसीटीव्हीचा वॉच सुरु झाला असून 752 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडे निधीची मागणी केली आहे. यामध्ये 172 शाळांना निधी दिला असतानाही तेथे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केलेले नाहीत. त्याचा प्राथमिक शिक्षण विभागाकडून आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
शाळांमध्ये विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचारांच्या घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविण्याचा विचार करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यसरकारला दिले होते. न्यायालायाच्या निर्देशानुसार आणि शाळांमधील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी राज्यसरकारने राज्यातील सर्व माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. या निणर्यानुसार खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम राज्यातील सर्वच शाळांमध्ये सुरू आहे. शाळांमध्ये सीसीटीव्ही पॅमेरे बसविताना आवश्यकता असलेल्या ठिकाणी बसविणे अपेक्षित आहे. जिल्हापरिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जिह्यातील सर्व माध्यमाच्या खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याबाबतची खात्री करून त्याबाबतची एकत्रित माहिती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करावी लागणार आहे.
शासनाने जि.प. शाळांमध्ये तसेच उर्वरित सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविण्यासाठी येणारा खर्च हा 4 टक्के अनुदान, समग्र शिक्षा शाळा अनुदान, तसेच सी.एस.आर. व लोकसहभागातून करण्याच्या शासनाने सूचना दिल्या होत्या. शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविल्यानंतर आवश्यकतेनुसार ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासण्याचेही शासनाने निर्देशित केले आहे. त्यामध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आलेस त्यावर कार्यवाही करणेची जबाबदारी शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची राहील. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत शाळांना सूचना
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांपैकी 1038 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले असून 752 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून निधीची मागणी केली आहे. यामध्ये 172 शाळांना निधी दिला असून तेथे सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याबाबत आढावा घेतला जात आहे. लवकरच सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीचा वॉच सुरु होईल.
मीना शेडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.कोल्हापूर
सर्व शाळा परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत येणे आवश्यक
जिह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पण काही शाळांमध्ये मोजके कॅमेरे बसविल्यामुळे सर्व परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरावर लक्ष राहण्यासाठी आवश्यक प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना संबंधित शाळांना दिल्या आहेत.
एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प.कोल्हापूर








