खेड :
सर्वसामान्य जनता एसटीमधून प्रवास करत असते. त्यामुळे सर्वांना एसटीबद्दल एक वेगळी आपुलकी आहे. एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिह्यातील छोट्या–मोठ्या 22 बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने गोळीबार मैदान येथे नवे बसस्थानक उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. या बसस्थानकाचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते रविवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, प्रवाशांच्या सुरक्षितेबरोबरच त्यांचे आरोग्यमान सुदृढ राहणे तितकेच अत्यावश्यक आहे. यासाठी बसस्थानकातील सर्व शौचालयेही स्वच्छ असणे गरजेचे असून ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता येथे मिनी बसेस देण्याच्या मागणीसाठी जिह्यातील सर्व आमदारांसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भेट घेणार आहोत. पुढील 6 महिन्यात मिनी बसेस उपलब्ध करून घेऊ, असा विश्वासही व्यक्त केला.
- अनेक वर्षांची मागणी पूर्ण होतेय : योगेश कदम
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, येथील गोळीबार मैदानात लवकरच सर्व सोयी सुविधांनी युक्त बसस्थानक उभे राहणार आहे. या नव्या बसस्थानकामुळे तालुक्यातील जनतेची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होत आहे. या बसस्थानकामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासासह समस्याही कायमच्याच दूर होणार आहेत. नवे बसस्थानक उभे राहणार असल्याने आता मैदानाची गरज भासणार आहे. जिल्हा नियोजनमधून मैदानासाठी येथील मागील बाजूला आरक्षित जागेवर क्रीडांगणासाठी निधी द्यावा, अशी मागणीह केली असल्याचे कदम यांनी सांगितले. याप्रसंगी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जि. प. माजी सदस्य अऊण कदम, शहरप्रमुख कुंदन सातपुते, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, तहसीलदार सुधीर सोनवणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्यासह एसटी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.








