स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण : दिल्ली पोलिसांकडून तपास-शोधमोहीम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी तपास सुरू केला आहे. प्रिंटर आणि लॅपटॉप घेऊन पोलिसांचे पथक रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. काही वेळाने दिल्ली पोलिसांचे पथक सीसीटीव्हीचा डीव्हीआर सोबत घेऊन येथून बाहेर आले. यापूर्वी पोलिसांनी केवळ सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.
पोलिसांना मारहाणीच्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप प्राप्त झाले नसल्याचे समजते. सीसीटीव्हीमध्ये छेडछाड झाल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे. तसेच या मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेला विभव हा तपासात सहकार्य करत नसल्याचेही पोलीस सांगत आहेत. पोलिसांनी विभवचा आयफोनही ताब्यात घेतला आहे. मात्र आता आरोपी त्याचा पासवर्ड सांगत नाही. तसेच फोन फॉरमॅट करण्यात आल्यामुळे त्यातील बराचसा डाटा गायब होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस विभवला त्याच्या पाच दिवसांच्या रिमांडमध्ये मुंबईला घेऊन जाणार आहेत. फोन फॉरमॅट करण्यापूर्वी विभवने त्याचा डेटा डंप केला असावा, अशी पोलिसांना आशा आहे. मुंबईतील ज्या ठिकाणी फोन फॉरमॅट झाला आहे तेथे गेल्यास डंप केलेला डेटा मिळू शकतो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जर लपवण्यासारखे काही नसेल तर लोक सहसा फोन फॉरमॅट करण्यापूर्वी डेटा सेव्ह करतात. मात्र, पोलीस फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने डेटा रिकव्हर करण्याचाही प्रयत्न करणार आहेत. याशिवाय पोलीस विभवला गुन्ह्याच्या ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेऊन जाणार असून तेथे ते भांडणाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतील.
13 मे रोजी स्वाती यांच्यावर हल्ला
स्वाती मालीवाल यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, त्या 13 मे रोजी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली होती. ती प्रथम मुख्यमंत्र्यांच्या पॅम्प ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पीएस विभव कुमार यांना फोन केला, मात्र चर्चा होऊ शकली नाही. त्यानंतर विभवच्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअॅप मेसेजही केला, पण त्यालाही उत्तर मिळाले नाही. यानंतर, ती नेहमीप्रमाणे मुख्य दरवाजाने सीएम केजरीवाल यांच्या घरी गेली. त्याठिकाणीच मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुऊवात झाल्याचा दावा केला जात आहे.
विभव कुमारविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
हे प्रकरण पोलिसात पोहोचल्यानंतर विभवविऊद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. सध्या, या एफआयआरमध्ये, पोलिसांनी आयपीसी कलम 308 (हत्येचा प्रयत्न), 323 (हल्ला-मारहाण करणे), 341 (चुकीच्या पद्धतीने रोखणे), 354 (विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला), 354बी (एका महिलेला विवस्त्र करणे) अशी नोंद केली आहे. विभव कुमारविऊद्ध 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि 509 (विनयभंग करण्याचा प्रयत्न) लादण्यात आले आहे. यानंतर शनिवारी पोलिसांनी विभवला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती.









