कडोली दसरोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक, ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सणाचा आनंद लुटण्याचे आवाहन
वार्ताहर/कडोली
गुरूवार दि. 2 ऑक्टोबर रोजी होणारा कडोली गावचा ऐतिहासिक दसरोत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यात्रेत सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरांची नजर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर राहणार असल्याचे काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी सांगितले.
कडोलीतील ऐतिहासिक दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडोली ग्राम पंचायत आणि काकती पोलीस ठाणे यांच्यावतीने येथे शांतता समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष सागर पाटील होते. प्रारंभी डॉ. विनोद पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात कडोली गावच्या ऐतिहासिक दसरोत्सवाची परंपरा आणि महत्त्व सांगितले. संपूर्ण कर्नाटकात म्हैसूरनंतर अत्यंत प्रमाणात साजरा होणारा कडोली गावचा दसरोत्सव यावर्षीही परंपरेनुसार शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचेआहे. गावातील तरुण कार्यकर्त्यांना योग्य सूचना देण्यासाठी अनेकांनी यावेळी मार्गदर्शन दिले.
यावेळी कडोली गावचे पण मुंबई येथे सेवा बजावून निवृत्त झालेले पोलीस अधिकारी सुभाषमॅगेरी यांनी दसरोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करुन दसऱ्याचा आनंद लुटवा, असे मत सांगितले. तर माजी जि.पं. सदस्य उदय सिद्दण्णावर यांनी साऊंड सिस्टीमचा कोणालाही त्रास होवू नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे सांगितले. तसेच देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धनंजय कटांबळे यांनी देवाचे धार्मिक कार्यक्रम वैळेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी तरुणांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंगे यांनी तरुण कार्यकर्त्यांनी उद्देशून बोलताना म्हणाले, कडोली गावच्या दसरोत्सवाची महती मोठी आहे. हा सदरा सणांचा आनंद लुटा पण योग्यनियमाचे पालन करुन करा. साऊंड सिस्टीमचा कोणालाही त्रास होणार नाही, पै, पाहुण्यांना जाण्या-येण्यासाठी त्रास होऊ नये, रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करायचे आहे, असे सांगून मिरवणूकीत प्रमुख मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रॉन कॅमेरांची नजर ठेवली जाणार आहे. यात्रेत हुलडबाजी आणि दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तेंव्हा याचे भान ठेवून तरुणांनी दसऱ्याचा हा सण उत्सहात साजरा करा. यावेळी या बैठकीला ग्राम पंचायत सदस्य, देवस्थान पंच कमिटी सदस्य, युवक मंडळाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.









