सातारा :
सातारा शहरात होणाऱ्या चेन स्नॅचिंग, दुचाकी चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा घटनांवर आळा घालण्यासाठी सातारा पोलिसांनी शहरात लावलेले 32 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवले आहे. सार्वजनिक मंडळांच्या आगमन मिरवणूक ही सुरू झाल्या. मिरवणूक पाहण्यासाठी राजवाडा, गोलबाग, मोतीचौक, राजपथावर प्रचंड गर्दी होत आहे. डीजे डॉल्बीवर युवकांचा धिंगाणा सुरू आहे. मात्र या संपूर्ण गर्दीत कोणत्याही अनुचित प्रकारावर देखरेख ठेवण्यासाठी लावण्यात असलेले 32 सीसीटीव्ही कॅमेरे चक्क बंद असल्याने सातारकरांची सुरक्षा आता रामभरोसे म्हणावी लागेल.
पोलीस मुख्यालय ते राजवाडा आणि मुख्यालय ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक, वाढे फाटा अश्या दोन विभागात 16-16 असे 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र योग्य देखभालीअभावी हे संपूर्ण कॅमेरे सध्या बंद आहेत. मिरवणूक काळात होणारी गर्दी पाहता हे बंद कॅमेरे तातडीने चालू करण्यासाठी पाऊले उचलली जाणे आवश्यक होते. मात्र या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यास विचारले असता, मेंटेनन्सअभावी कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले. वायर तुटणे हे कारण होऊ शकत नाही आणि जर तुटलीच असेल तर ज्या ठेकेदाराला दुरुस्तीचे काम दिले आहे त्याच्याकडून ते तातडीने दुरुस्त करून घेणे ही पोलिसांची जबाबदारी आहे.
मात्र मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये याबाबत कोणालाही काहीही पडलेले नाही असे दिसते, कॅमेऱ्यात नजर ठेवणारे कर्मचारी क्रिन बंद असल्याने निवांत वेळ घालवत आहेत. येत्या 27 ऑगस्ट रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. यासाठी लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर येतात. सोबत भरपूर पैसेही असतात याचा फायदा घेत, पर्स चोरी, पाकिटमारी, गर्दीत छेडछाड अशा घटना होण्याची भीती असते आणि असे होऊ नये. रस्त्यावरील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी या सीसीटीव्हीचा मोठा उपयोग होतो. मात्र सध्या हे 32 कॅमेरे बंद असल्याने संबंधित विभाग नेमकं कंट्रोल रूममध्ये बसून काय काम करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस खाते बंद कॅमेऱ्याने कसे निगराणी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे..








