पडताळणी होत असल्याचे दिसेना, मुख्याधिकारी कक्षातील कॅमेरा हटविल्याने चर्चेचा विषय
मडगाव : मडगाव पालिकेत कामचुकारांवर लक्ष ठेवण्यासाठी 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले, तरी या कॅमेऱ्यांच्या चित्रणाची पडताळणी केली जात आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येत असून नुकताच मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षामधील कॅमेरा हटविण्यात आल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. मडगाव पालिकेचे काही कर्मचारी वेळेत कामावर येत नसल्याच्या तसेच कामावरून वेळ संपण्याअगोदरच निघून जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मागील दोन वर्षांहून अधिक काळ पालिकेतील फिंगर स्कॅन यंत्र बंद पडल्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रणाची पडताळणी केल्यास कामचुकार व वेळचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे शक्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
लिंडन पेरेरा हे नगराध्यक्ष असताना नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी आणि पालिकेच्या विविध विभागांमध्ये 32 कॅमेरे सुमारे 2.5 लाख खर्चून बसविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पालिकेतील सोपो वसुलीची 50 हजारांची रक्कम गायब झाली. त्यावेळी ज्या मार्केट निरीक्षकांच्या टेबलावरून ती रक्कम गायब झाली नेमका तेथील कॅमेरा बंद असल्याचे आढळून आले असून त्यामुळे आजपर्यंत या चोरीचा थागपत्ता लागू शकलेला नाही. बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी नगराध्यक्षांच्या कक्षात पूर्वी कधी कॅमेरे बसविण्यात आलेले नसल्याने मध्यंतरी तो काढण्यात आला होता. मात्र नुकताच मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातील सीसीटीव्ही कॅमेरा हटविण्यात आल्याने काही नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असल्यास त्यामुळे कोणास अडचण होते व तो कॅमेरा कोणी आणि का हटविला याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, असे एका नगरसेवकाने स्पष्ट केले.









