क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय सेकंड झोन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका धारवाड संघाने विजया क्रिकेट अकादमीचा 275 धावांनी तर हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने स्पोर्टस् अकादमी गदग अ संघाचा 184 धावांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. अखिल एस. व कौस्तुभ पी. एल. यांनी शतके झळकविली.
हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने 50 षटकात 7 बाद 354 धावा केल्या. कौस्तुभ पी. एल. ने 3 षटकार आणि 15 चौकारासह 100, समीत प्रभूने 86, अनमोल पागदने 46 धावा केल्या. स्पोर्टस् अकादमी गदगतर्फे शिवराज, अक्षय, कार्तिक, सचिन, झाईद, अल्तमश यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पोर्टस् अकादमी गदग संघाचा डाव 28.2 षटकात 170 धावात आटोपला. सचिन पाटीलने 65, झाईद अख्तरने 43, अल्तमश काजीने 25 धावा केल्या. हुबळीतर्फे मनिकांत बुकीटगारने 6 धावात 4, ऋषभ पाटील व महांतेश यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका धारवाड संघाने 50 षटकात 9 बाद 395 धावा केल्या. अखिल एस. ने 121, राहुल मानेने 67, तेजस मुर्डेश्वरने 40, नवनीतने 26 तर लिखित बन्नूरने 24 धावा केल्या. विजयातर्फे अर्जान, अमोघ व प्रेम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्यानंतर विजया क्रिकेट अकादमीचा डाव 29.3 षटकात 120 धावात आटोपला. रोशन बेकवाडकरने 40, रोहन कांबळेने 29 धावा केल्या. धारवाडतर्फे तेजस मुर्डेश्वरने 4, संतोष व लिखितने प्रत्येकी 2 बळी टिपले.









