42 लिटर बेकायदा दारूसाठा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
निलजीजवळील एका ढाब्यावर छापा टाकून बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून ढाबाचालकाविरुद्ध मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सीसीबीचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी निलजीजवळील कुबेर ढाब्यावर छापा टाकला. या कारवाईत 42 लिटर 240 मिली इतका बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
ढाबाचालक रवी लोकप्पा कोटबागी, रा. श्रीरामनगर, मुतगा याच्यावर कर्नाटक अबकारी कायदा 32, 34, 15(ए) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जप्त दारूसाठ्याची किंमत 16 हजार 923 रुपये इतकी होते. कोणतीही परवानगी किंवा पासशिवाय ढाब्यावर दारूविक्री केली जात होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.









