सर्टिफिकेटसाठी अनेकांचे महापालिकेकडे अर्ज : वीज, नळ, भुयारी गटार जोडणीसाठी सक्ती
बेळगाव : ई-आस्थी प्रणाली अंतर्गत ए खात्यात मिळकतीची नोंद करण्यासाठी बिल्डींग कम्प्लीशन सर्टिफिकेटची सक्ती आहे. त्यामुळे महापालिकेकडे कम्प्लीशन सर्टिफिकेटसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीज, नळ व भुयारी गटार जोडणीसाठीही कम्प्लीशन सर्टिफिकेटची सक्ती करण्यात आली आहे. हेस्कॉम, महापालिका व एलअँडटी कंपनीकडून नवी जोडणी देताना ही सक्ती केली जात आहे. त्यामुळेच कम्प्लीशन सर्टिफिकेट घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ई-खात्यांतर्गत मिळकतींची नोंद करण्यासाठी कम्प्लीशन सर्टिफिकेटची सक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी केली होती. त्याचबरोबर यावर लोकप्रतिनिधी देखील मनपा आयुक्तांशी चर्चा करणार होते. पण याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही.
महापालिकेकडून बांधकाम परवाना घेताना इमारतीचा आराखडाही सादर करावा लागतो. तो आराखडा नियमानुसार असेल तर महापालिकेकडून मंजूर केला जातो. त्यानंतर बांधकाम परवानाही देण्यात येतो. मात्र, महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याचे उल्लंघन झाल्यास बांधकाम परवाना देण्यात येत नाही. तसे प्रकारही बेळगावात अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश बांधकामांचे मालक महापालिकेकडे कम्प्लीशन सर्टिफिकेट घेत नाहीत. सर्टिफिकेटसाठी अर्ज दाखल केल्यास मंजूर आराखड्यानुसार इमारतीचे बांधकाम झाले आहे की नाही, याची पडताळणी महापालिकेकडून केली जाते. बेळगावात कम्प्लीशन सर्टिफिकेट घेणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. आजपर्यंत वीज व नळ जोडणीसाठी सीसीची सक्ती झाली नाही. त्यामुळेच सीसी घेणाऱ्यांची संख्याही कमी होती. मात्र, आता ई-आस्थी अंतर्गत मिळकतींची नोंद करणे, नळ व वीज जोडणीसाठी सीसीची विचारणा केली जात असल्याने अनेकांची गोची झाली आहे.









