पुणे / प्रतिनिधी :
देशभरात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे आकर्षण वाढत असताना आता हे मंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याबाबत केंद्र शासन गांभीर्याने विचार करत असल्याचे सूतोवाच केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी येथे केले.
जी-20 निमित्त पुण्यात शिक्षण कार्य गटाच्या प्रतिनिधींची बैठक होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. केंद्रीय शिक्षण विभागात वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधान म्हणाले, जपान येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) शाळा असून तेथे केवळ भारतीय नव्हे, तर जपानी विद्यार्थीसुद्धा शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती इतर बोर्डांपेक्षा अधिक चांगली वाटते. त्यातून आपणही ‘सीबीएसई’ला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बोर्ड म्हणून सादर करावे, असा विचार समोर आला. ‘सीबीएसई’ला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय बोर्ड म्हणून सादर करण्याच्या त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. जपानमधील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम इतर बोर्डांपेक्षा अधिक चांगला वाटत आहे. सीबीएसई बोर्डाच्या गणित व विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमातून इतर बोर्डाच्या अभ्यासक्रमांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांना अधिक सखोल ज्ञान मिळत आहे. त्यामुळे आपणही ‘सीबीएसई’ बोर्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जात आहोत. भारतात काही विद्यार्थी आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेतात. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाचे शिक्षण घेता यावे, असा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.