29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकारी चौकशी करणार
तपासाला गती…
- देशाच्या विविध भागातून 29 महिला अधिकाऱ्यांना पाचारण
- पथकामध्ये डीआयजी दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश
- 16 निरीक्षक, 10 उपनिरीक्षकांचाही तपास पथकात समावेश
- महिला अत्याचाराबाबतच्या गुन्ह्यांच्या तपासात लक्ष घालणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मणिपूरमधील जातीय हिंसाचाराच्या तपासासाठी विविध पदांच्या 29 महिला अधिकाऱ्यांसह 53 अधिकाऱ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. सीबीआयच्या तपासात सुऊवातीच्या प्रकरणांमध्ये दोन महिला डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 29 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराबाबत अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी 17 प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयच्या तपास पथकामध्ये तीन उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये लवली कटियार, निर्मला देवी आणि मोहित गुप्ता यांची नावे समाविष्ट आहेत. सदर महिला अधिकारी राज्यातील हिंसाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी वेगवेगळ्या पथकांचे नेतृत्व करतील. त्यांच्यासमवेत अधीक्षक राजवीर शमिल आणि सहसंचालक घनश्याम उपाध्याय यांची नियुक्तीही केली आहे. तसेच दोन महिला अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सहा महिला पोलिस उपअधीक्षकांचा तपास पथकात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय 16 निरीक्षक आणि 10 उपनिरीक्षकांचाही चौकशी पथकात समावेश करण्यात आला आहे.
सीबीआय मणिपूर हिंसाचाराशी संबंधित आणखी नऊ प्रकरणांची चौकशी करणार आहे. यापूर्वी सीबीआय आठ प्रकरणांचा तपास करत होती, म्हणजेच सध्या एकूण 17 प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयच्या तपासांमध्ये हिंसाचाराव्यतिरिक्त लैंगिक छळाच्या प्रकरणांचाही समावेश आहे. महिलांवरील गुन्हे किंवा लैंगिक छळाशी संबंधित अन्य प्रकरणेही प्राधान्याच्या आधारावर सीबीआयकडे पाठवली जाऊ शकतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 च्या तरतुदी सीबीआयकडून तपासल्या जात असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये लागू केल्या जाऊ शकतात. सदर प्रकरणांची चौकशी उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल, अशी माहिती देण्यात आली होती. मणिपूरमध्ये 3 मेपासून जातीय हिंसाचार सुरू असून त्यामध्ये 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील बहुसंख्य मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी ‘आदिवासी एकता मार्च’ काढण्यात आल्यानंतर मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये संघर्ष झाला. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी मैतेई समुदायाचा वाटा सुमारे 53 टक्के आहे आणि ते मुख्यत: इम्फाळ खोऱ्यात राहतात, तर आदिवासी नागा आणि कुकी समुदाय 40 टक्के असू ते बहुतेक डोंगराळ जिह्यांमध्ये राहतात.









