11 राज्यांमध्ये 76 ठिकाणी छापे : आंतराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे वाढते प्रमाण
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सायबर गुन्हे रोखण्यासाठी सीबीआयने गुरुवारी देशव्यापी मोहीम ‘ऑपरेशन चक्र 2’ राबविली आहे. विविध राज्यांमध्ये विशेषकरून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, पंजाब, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालसह एकूण 11 राज्यांमध्ये 76 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयने याचदरम्यान 5 गुन्हे नोंद केले आहेत. ही कारवाई अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टच्या तक्रारीवर सीबीआयकडून करण्यात आली आहे. सीबीआयने या कारवाईदरम्यान 32 मोबाईल फोन, 48 लॅपटॉप, 33 सिम कार्ड्स आणि पेन ड्राइव्ह जप्त केले आहेत. याचबरोबर अनेक बँक खात्यांना तपास यंत्रणेकडून गोठविण्यात आले आहे. सीबीआयने 15 ईमेल अकौंट्सचा तपशीलही स्वत:च्या ताब्यात घेतला आहे. या तपशीलामधून लोकांची फसवणूक करण्याचे काम करणाऱ्या आरोपींच्या कटाचा खुलासा झाला आहे.
ऑपरेशन चक्र 2 अंतर्गत इंटरनॅशनल टेक सपोर्ट फ्रॉड स्कॅमची दोन प्रकरणे देखील समोर आली आहेत. आरोपी 5 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 9 कॉल सेंटर्स चालवित होते. तसेच टेक्निकल सपोर्ट प्रतिनिधी म्हणून स्वत:ची ओळख करून देत संघटित पद्धतीने विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करत होते. भारतातील संघटित सक्रिय सायबर फायनान्शियल क्राइम्स संपविणे हा या कारवाईमागील उद्देश होता. सीबीआयने ही मोहीम खासगी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसोबत आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या मदतीने राबविली आहे. यादरम्यान सायबर गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे.









