कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांची कसून चौकशी
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत बेंगळूर येथील सीबीआय पथकाकडून चौकशी सुरू आहे. मागील 5 ते 6 दिवसांपासून सीबीआयचे पथक बेळगावमध्ये ठाण मांडून आहे. कर्मचारी भरतीवेळीच्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी, तसेच कर्मचाऱ्यांना बोलावून चौकशी करण्यात येत आहे. अजून आठवडाभर चौकशी सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
2022-23 मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 29 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. शिपाई, वॉचमन, हमाल, कुली, चौकीदार, मजदूर, मॅकेनिक असिस्टंट, तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. भरती प्रक्रिया राबवितानाच काही सदस्यांनी आक्षेप नोंदविला होता. आपल्या मर्जीतील उमेदवारांनाच पुढील नियुक्त्या दिल्या जात असल्याची तक्रार करण्यात आली. कॅन्टोन्मेंटचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपकेर यांनी सीबीआय, पंतप्रधान कार्यालय, तसेच संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवून या गैरव्यवहाराची माहिती दिली होती.
नोव्हेंबर 2023 पासून बेंगळूर येथील सीबीआयच्या विशेष पथकाकडून चौकशीचे सत्र सुरू आहे. या प्रकरणातील सर्व उमेदवारांची कसून चौकशी करण्यात आली. बेळगावसोबत बेंगळूर येथे कर्मचाऱ्यांना बोलावून तेथेही चौकशी झाली. नियुक्ती देण्यासाठी उमेदवारांकडून प्रत्येकी 15 ते 20 लाख रुपये घेण्यात आल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले. त्यामुळे नोकर भरतीतील गैरव्यवहाराचा ठपका ठेवत 5 अधिकारी व 14 उमेदवारांवर सीबीआयने बेंगळूर येथे गुन्हा नोंद केला.
पुढील आठवड्यापर्यंत चौकशी सुरू राहण्याची शक्यता
या प्रकरणाची शेवटच्या टप्प्यातील चौकशी मागील 5 ते 6 दिवसांपासून सुरू आहे. सीबीआयच्या पथकाकडून नोकर भरतीतील उमेदवार, तसेच अधिकारी यांची चौकशी करण्यात येत आहे. पुढील आठवड्यापर्यंत चौकशी सुरू राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रकरणाची तड लावण्याचा प्रयत्न सीबीआय पथकाकडून सुरू आहे. आतापर्यंत बेळगावमध्ये 4 ते 5 वेळा तर बेंगळूर येथे एकवेळ चौकशी करण्यात आली आहे.









