कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी भरती गैरव्यवहार प्रकरण : आतापर्यंत पाचवेळा चौकशी
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील कर्मचारी भरती प्रकरणाची चौकशी करणारे पथक पुन्हा माघारी फिरले. आठवडाभर सखोल चौकशी केल्यानंतर महत्त्वाचे पुरावे घेऊन सीबीआयचे पथक बेंगळूरला गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु या प्रकरणातील दोषींवर केव्हा कारवाई होणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीत आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 29 कर्मचाऱ्यांची 2023 मध्ये भरती करण्यात आली होती. यामध्ये अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची दखल घेऊन मागील दोन वर्षांपासून सीबीआय चौकशीचे सत्र सुरू आहे. या प्रकरणासाठी आतापर्यंत बेंगळूर येथील सीबीआयच्या पथकाने बेळगावमध्ये येऊन पाचवेळा चौकशी केली आहे. तसेच पाच अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल केले होते.
29 मे ला सीबीआयचे पथक पुन्हा बेळगावमध्ये दाखल झाले होते. आठवडाभर भरती प्रक्रियेतील सर्व उमेदवारांची चौकशी केली. त्यांची कागदपत्रे व उत्तर पत्रिका यांची तपासणी करण्यात आली. तसेच यातील काही कागदपत्रे बेंगळूर येथे घेऊन गेले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2025 मध्ये तीनवेळा हे पथक बेळगावला आल्याने या प्रकरणाची उकल लवकरच होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून कर्मचारी भरती प्रकरणातील गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडून सुरू आहे. ज्या उमेदवारांना इंग्रजी येत नाही, त्या उमेदवाराच्या उत्तर पत्रिका इंग्रजीमध्ये लिहिण्यात आल्याचे धक्कादायक खुलासे यापूर्वी उघड झाले होते. त्यानंतर बेंगळूर येथे पाच जणांवर एफआयआर करण्यात आली. परंतु अद्याप दोषींवर कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे दोषींवर नेमकी केव्हा कारवाई होणार हे पहावे लागणार आहे.









