6 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी बुधवारी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. सीबीआयचे अन्य पथक रायपूर आणि भिलाई येथेही छाप्यासाठी पोहोचले. यापूर्वी ईडीच्या पथकाने बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. ही कारवाई 6 हजार कोटी रुपयांच्या महादेव अॅप घोटाळ्याप्रकरणी केली जात आहे.
सीबीआयच्या पथकांनी रायपूर आणि भिलाईमध्ये बघेल यांच्या निवासस्थानसोबत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बघेल यांच्या निकटवर्तीयाच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सीबीआयचे पथक कारवाई करत असताना संबंधित ठिकाणांच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आले.
बघेल यांच्या पदुमनगर निवासस्थानी सीबीआयने झडती घेतली आहे. याचबरोबर भिलाईनगरचे आमदार देवेंद्र यादव यांच्या निवासस्थानीही सीबीआयने छापा टाकला आहे. तर आयपीएस अधिकारी अभिषेक पल्लव यांच्या ठिकाणीही झडती घेण्यात आली. दुर्ग जिल्ह्यात सीबीआयने 16 ठिकाणी छापे टाकले असून यात माजी पोलीस महासंचालक आनंद छाबडा, आयपीएस अधिकारी प्रशांत अग्रवाल, आयपीएस अधिकारी अभिषेक महेश्वरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी ईडीने छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी बघेल आणि त्यांच्या पुत्राच्या ठिकाणांवर 10 मार्च रोजी छापे टाकले होते.
भाजपने यापूर्वी बघेल यांच्या निवासस्थानी ईडीला पाठविले होते. आता बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआय दाखल झाले आहे. बघेल हे पक्षाच्या कामानिमित्त दिल्लीला जाणार होते, बघेल यांना राजकीय स्वरुपात सामोरे जाता येत नसल्याने भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला यांनी केला आहे.









