‘एफसीआय’शी संबंधित 74 जणांवर गुन्हा दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय अन्न महामंडळातील (एफसीआय) घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने बुधवारी तीन राज्यांतील 50 ठिकाणी छापे टाकले. छापे टाकण्यात आलेल्या राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा आणि दिल्लीचा समावेश आहे. छाप्यादरम्यान वेगवेगळय़ा ठिकाणांहून या प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय राईस मिल मालक आणि धान्य व्यापाऱयांची नावेही समोर आली आहे. याप्रकरणी ‘एफसीआय’शी संबंधित 74 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या आठवडय़ात ‘एफसीआय’शी संबंधित भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघड झाला होता. ‘एफसीआय’चे डीजीएम राजीव कुमार मिश्रा यांच्या अटकेनंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. मंगळवारी तपास यंत्रणेने राजीव कुमार मिश्रा यांना चंदीगड येथून लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
तांदूळ आणि धान्य गोदाम कंपन्या निकृष्ट दर्जाचे धान्य आणि तांदूळ खरेदी करून एफसीआयला चढय़ा भावाने विकत असत. ही सारी हेराफेरी एफसीआयच्या अधिकाऱयांच्या मदतीने सुरू होती. तपास यंत्रणा अनेक दिवसांपासून त्या अधिकाऱयांवर आणि धान्य गिरणीच्या मालकांवर लक्ष ठेवून होती. त्यानुसार गेल्या आठवडय़ात लाच प्रकरण उघड झाल्यानंतर आता तपास यंत्रणांनी या घोटाळय़ाशी संबंधित अन्य संबंधितांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक सहाय्यकापासून ते कार्यकारी संचालकांपर्यंत विविध पातळीवरील अधिकाऱयांकडून संगनमताने लाचखोरी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात होते. प्रकरणाची खातरजमा झाल्यानंतर पूर्ण तयारीनीशी सीबीआयने बुधवारी त्यांच्यावर कारवाई सुरू केली.
तक्रारींची दखल
एफसीआयमधील भ्रष्टाचाराबाबत सीबीआयला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर एजन्सीने या संगनमताच्या विरोधात कारवाई सुरू केली. यामध्ये अन्नधान्य खरेदी, गोदाम आणि वितरक, राईस मिल मालक, धान्य व्यापारी यांचा समावेश होता. गेल्या सहा महिन्यांपासून एजन्सी त्यांच्याविरुद्ध गुप्त यंत्रणांद्वारे नजर ठेवत माहिती गोळा करत होती. इनपुट मिळाल्यानंतर सीबीआयच्या पथकाने दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक शहरांमध्ये छापे टाकले.









