महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या 2 साधू आणि त्यांच्या चालकांच्या हत्येची चौकशी राज्य सरकार सीबीआयला सोपविणार आहे. राज्य सरकारकडून ही माहिती मिळाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाशी संबंधित सुनावणी बंद केली आहे. 2020 मध्ये झालेल्या या हत्याप्रकरणांचा तपास सीबीआयला सोपविण्याची मागणी करणाऱया 2 याचिका प्रलंबित होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारने सीबीआयला चौकशी सोपविण्यास विरोध दर्शविला होता. तर आता शिंदे सरकारने याप्रकरणी सीबीआयकडे चौकशी सोपविली जाणार असल्याचे सांगितले आहे.
16 एप्रिल 2020 रोजी 72 वर्षीय साधू कल्पवृक्ष गिरी आणि 35 वर्षीय सुशील गिरी महाराज हे स्वतःच्या गुरुच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी मुंबईहून सूरतच्या दिशेने जात होते. त्यांच्यासोबत वाहनचालक निलेश तेलगडे देखील होता. पालघर येथे उग्र जमावाने त्यांच्या वाहनाला घेरले होते. संबंधित भागात मुले चोरणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरल्याने हा जमाव एकवटला होता. जमावाने या तिघांना याच टोळीचे सदस्य समजून मारहाण केली होती आणि या मारहाणीत या तिघांना जीव गमवावा लागला होता.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर देशभरात संतापाची लाट पसरली होती. पोलीस साधूंचे रक्षण करण्याऐवजी त्यांना जमावाकडे स्वाधीन करत असल्याचे या व्हिडिओत दिसून आले होते. याप्रकरणाचा तपास निष्पक्ष यंत्रणेकडून करविण्याची मागणी करणारी महंत सिद्धानंद सरस्वती आणि वकील शशांक शेखर झा यांची याचिका दीर्घकाळापासून प्रलंबित होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मागील राज्य सरकारने याप्रकरणाचा तपास सीबीआयला सोपविण्याच्या मागणीला विरोध दर्शविला होता.