25 ऑगस्टला होणार सुनावणी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चारा घोटाळा प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांना दिलेला जामीन रद्द करण्याच्या सीबीआयच्या याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या तपशिलानुसार या प्रकरणावर येत्या शुक्रवारी म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्मयता आहे. केंद्रीय तपास संस्थेने जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे केली आहे.
सीबीआयच्या या पवित्र्यावर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू. यंत्रणांनी आम्हाला कितीही त्रास दिला तरी काहीही होणार नाही. आम्हाला काय करायचे आहे याबद्दल आम्ही स्पष्ट आहोत. न्यायालयात आम्ही लढू आणि जिंकून दाखवू, असे तेजस्वी यादव म्हणाले.
अविभाजित बिहारमध्ये लालूप्रसाद मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्यात कोट्यावधी ऊपयांचा चारा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. 1996 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला आणि पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. लालूप्रसाद यांना झारखंडमधील देवघर, दुमका आणि चाईबासा कोषागारांमधून फसवणूक करून पैसे काढल्याच्या चार चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. दोरांडा प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावला होता. गेल्यावषी एप्रिलमध्ये झारखंड उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यांना जामीन मंजूर केला होता.