श्रीराम सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : चौकशी न केल्यास आंदोलन
बेळगाव : मंगळूर जिल्ह्यातील बेळतंगडी तालुक्यातील धर्मस्थळ गावामध्ये 11 वर्षापूर्वी सौजन्या हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याने या प्रकरणातील संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे शिरस्तेदार एस. एम. परगी यांना देण्यात आले. 11 वर्षापूर्वी झालेल्या घटनेची न्यायालयात चौकशी सुरू होती. या प्रकरणातील अटक केलेल्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तर या प्रकरणातील खरे आरोपी कोण आहेत. त्यांचा शोध लावण्यात यावा, सौजन्या खून प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी. या प्रकरणामध्ये तपास अधिकारी आणि वैद्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. यासाठी सदर अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करून त्यांची चौकशी करण्यात यावी. सौजन्याच्या कुटुंबीयांना व या प्रकरणात अटक करून चौकशीअंती निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या संतोष राव यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये भरपाई देण्यात यावी. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी रवि कोकितकर, विनय अमरोळी, गंगाधर कुलकर्णी, विठ्ठल ग•ाr यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









