जग अधिकाधिक प्रगत होत असून मानवी जीवन पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी झाले आहे. परंतु एक इसम अद्याप आदिमानवाप्रमाणे जगत आहे. हा इसम गुहेत राहून निसर्गाच्या मदतीने जगत आहे. खास बाब म्हणजे या इसमाने स्वत:ला पृथ्वीवरील अंतिम गुहावासीय ठरविले आहे.
या इसमाचे नाव अलियाह असून त्याचे वय 62 वर्षे असल्याचे समजते. तो येमेनच्या सोकोत्रा बेटावर असलेल्या खडकाळ किनाऱ्यावर राहतो. अलियाहचे जीवन पूर्णपणे निसर्गावर निर्भर आहे. तो समुद्रातून मासे पकडत स्वत:चे पोट भरतो आणि आसपास मिळणाऱ्या सामग्रीतून स्वत:च्या गरजा पूर्ण करतो.
अलियाह गुहेत राहत असला तरीही त्याला भाषेचा वापर करणे जमते. अनेक वर्षांपर्यंत पर्यटकांशी संभाषण करून काही प्रमाणात त्याने इंग्रजी भाषा शिकली आहे. तो केवळ लंगोट परिधान करतो. अलियाहला एकूण 15 मुले होती, ज्यातील 9 आता हयात नाहीत. तरीही तो जीवनाबद्दल पूर्णपणे संतुष्ट आहे. अलियाह गुहेत झोपतो, पादत्राणांशिवाय टोकदार खडकांवर चालतो आणि हातांनी मासे पकडतो. त्याच्याकडे मोबाइल, वीज तसेच आधुनिक सुविधा नाही. तो केवळ हवा, पाणी आणि जमिनीच्या मदतीने जीवन जगत आहे. त्याचे घर प्राण्यांच्या हाडांनी सजविलेले आहे. तो निसर्गाच्या नियमांचे पालन करतो आणि समुद्रातून अन्न मिळविणे त्याला अत्यंत पसंत आहे.









