पोलिसांचा चोख बंदोबस्त : पासधारकांनाही धाडले माघारी : नागरिकांचा हिरमोड
बेळगाव : लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच दोन तरुणांनी घुसखोरी केल्यामुळे बुधवारी मोठा गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर विधानसौध परिसरातही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विधानसौधमध्ये जाणाऱ्यांची प्रवेशद्वारावरच तपासणी सुरू होती. पास असूनदेखील काही नागरिकांना सोडण्यात आले नाही. त्यामुळे विधानसौध अधिवेशनचे कामकाज पाहण्यासाठी जाणाऱ्यांचा हिरमोड झाला. 4 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. सभागृहाचे कामकाज कशा पद्धतीने चालते, याची माहिती व्हावी यासाठी शालेय विद्यार्थी भेटी देत आहेत. पहिल्या दिवसापासूनच विविध शाळांचे विद्यार्थी दाखल होऊ लागले आहेत. मात्र, बुधवारी लोकसभेत गोंधळ उडाल्याने बेळगावातील अधिवेशनात बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी जाणाऱ्यांना माघारी परतावे लागले. पास असूनदेखील पोलीस प्रशासनाने प्रवेशद्वारावरच अडवणूक करून माघारी धाडले. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. प्रशासनाने व पोलीस खात्याने अधिवेशनासाठी पास उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, या पासद्वारे विधानसौधमध्ये जायला दिले जात नसल्याने पास कशासाठी दिला? असा प्रश्नही काही नागरिकांनी उपस्थित केला. मात्र, काही शाळकरी आणि कॉलेजच्या विद्याथ्यर्नां विधानसौध परिसरात प्रवेश देण्यात आला. मात्र, काही जणांची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिसांनी दंडुकेशाही दाखवत माघारी धाडले.









