कार्यालयात येणाऱ्यांची मेटल डिटेक्टरने तपासणी
प्रतिनिधी / बेळगाव

विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यासाठी महापालिका कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मनपा कार्यालयात जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच कार्यालयात येणाऱ्यांची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. अर्ज भरण्यासाठी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. विशेषत: उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन केले जाते. महापालिका कार्यालयात दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाचे रिटर्निंग अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालयात आवश्यक तयारी करण्यात आली असून, गर्दी होण्याची शक्यता असल्याने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. हजारो कार्यकर्त्यांसह अर्ज भरण्यासाठी उमेदवार दाखल होत असतात. त्यामुळे कार्यालयात गर्दी होऊन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांच्या कार्यालयामध्ये पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमदेवारी अर्ज दाखल करताना गर्दी होण्याची शक्यता असल्याने महापालिका कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून चारचाकी वाहने मुख्य रस्त्याशेजारी पार्क करण्याची सूचना केली जात आहे. केवळ दुचाकी वाहनधारकांना मनपा कार्यालयाकडे प्रवेश दिला जात आहे. तसेच महापालिका कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चौकशी केली जात आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मेटल डिटेक्टरने तपासणी केली जात आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक कार्यात व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, याची खबरदारीदेखील निवडणूक आयोगाने घेतली आहे.









