जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणे यांची माहिती
बेळगाव : केरळ राज्यामध्ये निफाह व्हायरसचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आरोग्य खात्याकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोग्य खात्याचे मुख्य कार्यदर्शी टी. के. अनिलकुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधून योग्य उपाययोजना राबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी महेश कोणे यांनी दिली. निफाह व्हायरसचा फैलाव केरळ राज्यात झाल्याने गंभीर दखल घेण्यात आली आहे. रोगाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या प्रधान कार्यदर्शींनी दिलेल्या सूचनेवरुन जिल्हा आरोग्य खात्याकडूनही अधिक दक्षता घेण्यात येत आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची योग्य प्रकारे माहिती घेऊन तपासणी करण्यात येत आहे. रोगी कोणत्या ठिकाणांहून आला याचा मागमूस घेतला जात आहे. व्हायरसचे लक्षण आढळून आल्यास रुग्णांना दाखल करण्यासाठी आयसोलेटेड 10 खाटांची व्यवस्था सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सात तालुका रुग्णालयांमध्येही प्रत्येकी 5 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
ताप येणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची सूचना
ताप येणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारच्या सूचनेनुसार आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणे यांनी कळविले आहे. शेजारील केरळ राज्याच्या सीमावर्ती भागात येणाऱ्या चामराजनगर, कोडगू, म्हैसूर, दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये अधिक दक्षता घेतली आहे, असे आरोग्य खात्याच्या कार्यदर्शींनी कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये निफाह व्हायरसचा एकही रुग्ण नाही
जिल्ह्यामध्ये निफाह व्हायरसचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. रुग्णालयात योग्य ती तयारी करून घेण्यात आली आहे. केरळ राज्यातून येणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. तेथून आलेल्या नागरिकांना ताप आल्यास आरोग्य खात्याला माहिती द्यावी.
– डॉ. महेश कोणे-जिल्हा आरोग्याधिकारी









