सांगली / संजय गायकवाड :
सांगलीतील मध्यवर्ती आणि रेवणी रोडसारख्या प्रमुख रस्त्यावरील तरुण भारत व्यायाम मंडळा समोरील चौकात वाहन चालकांच्या चुकीमुळे रोज लहान मोठे अपघात होत आहेत. दिवसभर मोठी वाहतूक असणाऱ्या या चौकात वाहनचालकांचा बेफिकिरपणाच अपघाताला कारणीभूत ठरताना दिसत आहे.
रेवणी रोड हा सांगलीतील एक मुख्य रस्ता आहे. शहरातील स्टेशन रोडकडून भारती विद्यापीठ, शहर पोलीस स्टेशन आणि महापालिका मुख्यालयाकडून येणारी सर्व वाहने ही याच चौकाला क्रॉस करून स्टॅन्डकडे जातात. त्याशिवाय स्टॅन्डकडून मनपा व स्टेशन रोडकडे जाणाऱ्या एसटी बसेससह सर्व वाहनांना हा चौक क्रॉस करावा लागतो. दुसरीकडे आनंद चित्रमंदिर आणि मारूती रोडकडून आलेला एक रोड चौकाला मिळतो. तर हरभट रोड आणि भावे नाटयमंदिराकडून आलेला आणखी एक रोड या चौकाला येऊन मिळतो.
तरूण भारत स्टेडीयमच्या कोपऱ्यावरील या चौकाचे काही वर्षापुर्वी सांगलीतील माहेश्वरी समाजाच्यावतीने सुशोभिकरण करून माहेश्वरी चौक असे नामकरण केले. मुळातच हा चौक फार काही मोठा नाही. चौकाच्या एका कोपऱ्यावर तरूण भारत व्यायाय मंडळाचे ऑ फीस, आतमध्ये स्टेडीयम, समोर पेटोल पंप, रिक्षा स्टॉप, एसटी बसेसचा थांबा आणि स्टेडीयमच्या चारीही बाजूला असणारे दुकानगाळे असा व्यस्त असणारा भाग आहे.
या चौकानजीक सिटी बसचा स्टॉप आहे. त्याला लागूनच रिक्षास्टॉपही आहे. बाजूला हातगाड्या तसेच समोर वैरण अड्डाही आहे. चौकात प्रवासी तसेच दुचाकी आणि अन्य वाहनांची मोठी ये जा सुरू असते.
सांगली स्टॅन्डकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. सिव्हिल रोडला समांतर रोड म्हणून रेवणी रोडला गर्दी असते. जवळच प्रतापसिंह उद्यान, महापालिकेचे मुख्यालय, कार्यशाळाही आहे. तरूण भारत व्यायाम मंडळासमोरील चौकात दिवसभरात विशेषतः अनेक दुचाकीस्वार हे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून गाडया पळविण्याचा प्रयत्न करतात. रात्रीच्या वेळीही हेच प्रकार सुरू असतात. त्यामुळे या चौकात रोज एक तर अपघात होतोच, काही दिवसापुर्वी या चौकातील सुशोभिकरण केलेल्या मध्यभागाला धडकून एक चारचाकी फरफटत स्टेडीयमच्या कोपऱ्यावरील बसस्टॉपपर्यंत गेली होती. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला होता. सुदैवाने यात कोणी मयत झाले नाही. पण त्यावेळी अपघातात दोन चारचाकीचे मोठे नुकसान झाले. त्यापुर्वीही या चौकात अनेक छोटे मोठे अपघात झालेले आहेत.
चौकात दुचाकी गाड्यांची मोठी ये जा सुरू असते. चौकातून वाहनचालक वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. चौकातून रस्ता पार करणे म्हणजे जीवावर उदार होण्यासारखे आहे. येथे कोणताही वाहनचालक नियम पाळत नाही. बेशिस्तपणे गाडया चालविल्या जातात. मनपा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असूनही या चौकात वीजेची पुरेशी सोय नाही. भरीस भर म्हणून मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री बसस्टॉपवरील अतिक्रमणे आणि घाणेघाण यामुळे चौकाला बकालपण आले आहे. चौकानजीक कधीकधी महापालिकेची वाहने ही रस्त्यावर उभी केली जातात. रात्रीच्या वेळी या वाहनांना धडकूनही अपघात येथे झालेले आहेत.
चौकात ट्रैफिक सिग्नल बसवून आणि रोज वाहतूक पोलीस नियुक्त करूनही उपयोग नाही वाहनचालकांनी स्वतःहून शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे. चौकाला क्रॉस करताना समोरून दुसरे वाहने येत नसल्याची खात्री तसेच कोणी रस्ता पार करत नाही ना हे पाहूनच दुचाकीस्वारांनी संथगतीने जाण्याची आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यातही येथे अपघात होतच राहणार व त्यात कोणाला तरी जीव गमवावा लागणार अगर कोणीतरी जायबंदी होणार हे मात्र निश्चित आहे.








