50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
प्रतिनिधी / बेळगाव
लघुउद्योगासाठी राज्य सरकारकडून येणारी सबसिडी मंजूर करण्यासाठी 50 हजाराची लाच स्वीकारताना जिल्हा औद्योगिक केंद्राच्या दोन वरिष्ठ अधिकाऱयांना लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा औद्योगिक केंद्राचे संयुक्त संचालक शिवपुत्राप्पा आर. एच. व साहाय्यक संचालक पद्मकांत जी. यांना गिरीश कुलकर्णी या लघुउद्योजकाकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोकायुक्त विभागाच्या पोलीसप्रमुख यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रवी धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
सबसिडी संबंधीची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी गिरीश यांच्याकडून 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यासंबंधी गिरीश यांनी लोकायुक्त अधिकाऱयांकडे तक्रार केली होती. बुधवारी सायंकाळी जिल्हा औद्योगिक केंद्राच्या कार्यालयात लाच स्वीकारताना अचानक छापा टाकून अधिकाऱयांनी या दोघा जणांना अटक केली.









