विटा :
जनावरे चोरणारा अट्टल संशयित चोरटा विटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सागर जालिंदर पाटोळे (वय ३०, वेजेगांव, ता. खानापूर ) असे संशयिताचे नांव आहे. त्याचा सहकारी असलेल्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडील एक लाख, ५५ हजार रुपये किंमतीच्या सहा म्हैसी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले.
दरम्यान, पाटोळे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यास एक दिवस पोलिस कोठडीचा आदेश दिला. तर अल्पवयीन मुलाला नोटीस दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वलखड (ता. खानापूर) येथील राजाराम यशवंत जगदाळे यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यातून २३ व २४ मार्च २०२५ च्या दरम्यान तीन म्हैशी चोरी झाल्याची फिर्याद विटा पोलिसांत दिली होती.
त्यानुसार चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकमधील अंमलदार महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत वेजेगांव येथील रेकॉर्डवरील संशयित आरोपी सागर पाटोळे याने वलखड येथील म्हैशी चोरी केल्या आहेत. तो चिखलहोळ फाटा येथे फिरत आहे, अशी माहिती मिळाली.
गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदारांनी चिखलहोळ फाटा येथे सापळा रचून पाटोळे यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव सागर जालिंदर पाटोळे, (वेजेगांव, ता. खानापूर) असे सांगितले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने वलखड येथील राजाराम यशवंत जगदाळे यांच्या शेतातील गोठ्यातून म्हैशी चोरी केल्याचे कबुली दिली.
त्याच्याकडे सखोल, कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने चिखलहोळ, माहुली व भाग्यनगर येथून प्रत्येकी एक म्हैस चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या म्हैशी म्हैस मालकांना परत दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, अमोल पाटील, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, विकास जाधव, महेश देशमुख, महेश संकपाळ, अमोल कदम, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, सतीश आलदर, करण परदेशी, अभिजित पाटील, अजय पाटील यांनी केली.








