गावात पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने शेतकऱ्यांवर बाहेरून डॉक्टर मागवण्याची वेळ
सावंतवाडी प्रतिनिधी
नेमळे तसेच आजूबाजूच्या गावातील दुभत्या जनावरांना पुन्हा एकदा लंपी रोगाची लागण व्हायला सुरुवात झाली आहे. नेमळे गावात बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून संकरित देशी गाई पाळल्या असून लंपी सारख्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात 70 टक्के शेतकऱ्यांकडे दुभती जनावरे असून नेमळे गावासाठी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने या गुरांना कोणी वालीच राहिला नाही आहे. गुरांना काही आजार जडल्यावर शेतकऱ्यांना तालुक्यातून किंवा तालुक्या बाहेरून डॉक्टर बोलवावा लागतो. त्यामुळे लंपी हा संसर्गजन्य आजार सर्वत्र पसरू नये यासाठी गुरांना रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नेमळे ग्रामपंचायतीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती गावात करण्यात यावी याविषयी लक्ष वेधूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून लंपी आजाराने शेतकऱ्यांची गुरे दगावल्यास शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.









