युवकांचे उचगाव ग्रामपंचायतीला निवेदन : ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन
वार्ताहर/उचगाव
येथे यापूर्वी चोऱ्यांचे सलग सत्र कधी आढळून आले नव्हते. मात्र गेल्या एक महिन्यांमध्येच जवळपास सहा ठिकाणी सतत चोऱ्या झाल्याने नागरिक हैराण झाले. गावातील युवकांनी उचगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन गावात सुरू असलेले चोरीचे सत्र शोधून काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. गावामध्ये गेल्या महिन्याभरात सहा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे चोऱ्या झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. यासाठी गावातील जवळपास 50 युवकांनी ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष, पीडिओ, सेक्रेटरी यांना निवेदन देऊन या चोरी सत्रामागे कोण आहेत. याचा शोध घ्यावा अशी मागणी केली.
संशयितांची कसून चौकशी करा
व्यवसाय करण्यासाठी अनेक राज्यातून काही युवक तसेच जोडपी गावात आली आहेत. सदर युवक जोडप्याकडून गावातील माहिती घेऊन अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत आहेत. त्यासाठी नागरिकांनी परगावाहून आलेल्या संशयितांची कसून चौकशी करावी. तसेच गावांमध्ये विविध वस्तू विकण्यासाठी येणारे फेरीवाले यांच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्ल्यातून फेऱ्या सुरू असतात. अनेक ठिकाणी ते थांबून वस्तू विकत असतात. मात्र, हे करत असताना त्यांचे लक्ष इतर काही घरे, वस्तूकडे असते. यासाठी अशा फेरीवाल्यांवरही निर्बंध घालावेत. शासकीय माहिती मिळविण्यासाठी म्हणून खोटे सांगत घरातील माणसांची माहिती घेतात. घरामध्ये महिलावर्ग असल्याने त्यांना याची कल्पना येत नाही. परिणामी ते आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर, बँक खाते नंबर जमा करण्याचे अनेक प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत.
ऊस तोडणी कामगारावर लक्ष द्या
ऊस तोडणी कामगारावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. बाहेरून आलेल्यांचीही कसून चौकशी करावी, पोलीस खात्यानेही या भागात गस्त घालून अशा होणाऱ्या चोऱ्यावर आळा घालावा अशी जोरदार मागणी या युवकानी ग्रामपंचायतमध्ये केली. यावेळी अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पीडीओ शिवाजी मडिवाळ, ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबतीत आपण तातडीने उपाययोजना करू असे आश्वासन निवेदन देण्यासाठी गेलेल्या युवकांना दिले.









