गावात उडाला एकच गोंधळ : वनखात्याकडे सुपूर्द
वार्ताहर /कडोली
कडोली येथे अचानक पाठीमागील परसातून एक खवल्या मांजर जमादार यांच्या घरात शिरले. अचानक ते घरात शिरल्याने त्यांना काय करायचे हेच समजले नाही. त्यांनी आरडाओरडा करताच नागरिक जमले. खवल्या मांजराला पकडून वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. मात्र यावेळी बराच गोंधळ माजला होता. कडोली येथे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. अचानक खवल्या मांजर घरात शिरल्याने कुटुंबीयांची चांगलीच तारांबळ उडाली होती. खवल्या मांजर हा निशाचर प्राणी आहे. अधिकतर हे मांजर मुंग्या व वाळवी खात असल्याने ते अन्नाच्या शोधात गावात शिरले असावे, असा संशय आहे. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांकडे खवल्या मांजर सुपूर्द करण्यात आले.









