प्रियांका गांधी यांचे जाहीर सभेत आश्वासन
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील कांकेर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. राज्यात काँग्रेस पक्षाने पुन्हा सरकार बनवल्यास येथेही बिहारप्रमाणेच जातीवर आधारित जनगणना केली जाईल, असे प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले.

बिहारमध्ये जात जनगणनेचा अहवाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसनेही जात जनगणनेला आपला निवडणूक मुद्दा बनवला आहे. केंद्रात त्यांचे सरकार आल्यानंतर जात जनगणना केली जाईल, असे राहुल गांधी यांनी आधीच सांगितले आहे. आता शुक्रवारी प्रियांका गांधी यांनीही याचा पुनऊच्चार केला. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाने पुन्हा सरकार बनवल्यास येथेही जातीवर आधारित जनगणना केली जाईल, असे त्या म्हणाल्या. बिहार सरकारने 2 ऑक्टोबर रोजी जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यानंतर प्रियांका गांधी यांचे हे वक्तव्य आले आहे. बिहारमध्ये एकूण ओबीसी लोकसंख्या 63 टक्क्मयांहून अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
छत्तीसगड सरकारच्या लोककल्याणकारी योजना लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत असून त्या काँग्रेसच्या परंपरा पुढे नेत आहेत. 5 वर्षात छत्तीसगडच्या जनतेला जवळपास 2 लाख कोटी ऊपये गेले आहेत. छत्तीसगडमध्ये 40 लाख लोक दारिद्र्यारेषेच्या वर आले आहेत. गरीब, शेतकरी, आदिवासी यांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









