हा प्रकार देशाच्या एक्स रे सारखा
वृत्तसंस्था /हैदराबाद
काँग्रेस खासदार राहुल गांधी हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय तेलंगणा दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी गुरुवारी विजयभेरी यात्रेत भाग घेतला आहे. यात्रेच्या समारोपानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले आहे. तेलंगणात काँग्रेसचे सरकार येताच आम्ही जातनिहाय जनगणना करविणार आहोत. जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. यातून कुणाची किती लोकसंख्या आहे आणि कुणाकडे हिंदुस्थानचे किती धन आहे हे कळणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. जातनिहाय जनगणनेतून देशात किती दलित, ओबीसी, आदिवासी आणि सामान्य वर्गाचे लोक आहेत आणि कुणाची किती भागीदारी हे कळणार आहे. हे देशाच्या एक्स रेसारखे आहे. निधी कशाप्रकारे वितरित होतोय हे कळणार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. भाजपकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा लावला जात आहे. परंतु तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कुठलीच चौकशी का होत नाही? भाजप आणि बीआरएस हे परस्परांचे सहकारी असल्याने के. चंद्रशेखर राव यांची चौकशी होत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.









