कोल्हापूर :
सध्या कोल्हापुरातील जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चार ते पाच जिल्ह्यातील समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील 29 समितीमध्ये कमी अधिक प्रमाणात आहे. यामुळे समिती अध्यक्षांना एका जिल्ह्यात पूर्ण वेळ काम करता येत नाही. कोल्हापुरातील कार्यालयात हीच स्थिती आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रिक्त असणाऱ्या समिती अध्यक्षाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे कोल्हापूरसाठी आता पूर्ण वेळ अध्यक्ष मिळाल्या आहेत. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आता वेटींग करावे लागणार नाही.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात 60 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती देण्याचा आदेश काढले. त्यांची केवळ नियुक्तीच केली नसून या अधिकाऱ्यांपैकी 29 अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून पदस्थापना दिली. जात पडताळणी समिती अधक्ष्यांची ही 29 पदे काही वर्षापासून विविध कारणांनी रिक्त होती. त्यांचा अतिरिक्त कार्यभार दिला होता. एका अध्यक्षाकडे लगतच्या चार ते पाच जिल्ह्यातील जात पडताळणी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी होती. महिन्यांत एका ठिकाणी ते चार ते पाच दिवसच काम करू शकत होते. यामुळे जात पडताळणीचे काम जलदगतीने काम होत नव्हती. यामुळेच महसूल मंत्री बावनकुळे यांनी रिक्त जागेवर अध्यक्षांची नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचे कामकाज जलद गतीने होणार आहे. जात पडताळणी समितीकडे निर्णयविना रखडलेली ओबीसी, व्हीजेएनटी आणि एन टी संवर्गातील जात पडताळणीची अनेक प्रकरणे आता तातडीने मार्गी लागतील, असे अपेक्षित आहे.
दर वर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर जात पडताळणी समितीच्या कार्यालयात प्रमाणपत्रासाठी गर्दी होत असते. पूर्ण वेळ अध्यक्ष नियुक्त केल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
- अशी आहे जात पडताळणी समिती
समितीत अध्यक्ष, सदस्य आणि संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिवांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्षपद हे निवड श्रेणीत अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचे, सदस्यपद प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण दर्जाचे तर सदस्य सचिवपद सहायक आयुक्त समाज कल्याण दर्जाचे आहे.
- या जिल्ह्यातील समितीला मिळाले अध्यक्ष
मुंबई शहर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सांगली, कोल्हापूर, पुणे, नांदेड, नाशिक, धुळे, सातारा, जळगाव, बीड, सोलापूर, अहिल्यानगर, भंडारा, अमरावती, धाराशिव, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, वाशिम, नागपूर, धुळे गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा
- बदली रद्दसाठी फिल्डींग?
महसुलमंत्री बावनकुळे यांनी चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. परंतू काही अधिकारी वर्षभरात निवृत्त होणार असून त्यांना जात पडताळणी समिती अध्यक्षपदात स्वारस्य नसल्याची चर्चा आहे. सध्याच्या जिल्ह्यातच काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्याकडून बदली रद्द करण्यासाठी फिल्डींग लावली जात असल्याचीही बोलले जात आहे.
- स्वाती देशमुख कोल्हापुरात, संजय शिंदे वाशिमला
कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची बदली वाशिम येथील जात पडताळणी समिती अध्यक्षपदी पदोन्नतीने झाली आहे. तर कोल्हापूरच्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी स्वाती देशमुख यांची नियुक्ती केली आहे.








