वृत्तसंस्था /चेन्नई
मंदिरांमध्ये पुजारी किंवा पुरोहित होण्यासाठी जात आडवी येऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. कोणत्याही जातीचा व्यक्ती पुजारी होऊ शकतो. मात्र, त्याला त्या विशिष्ट मंदिरातील पूजाआर्चा, परंपरा आणि पौरोहित्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पूजापाठ करणाऱ्या व्यक्तीची पात्रता जातीवर ठरत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही जातीच्या व्यक्तीची निवड पुरोहित किंवा आर्चक म्हणून करण्याचा अधिकार कोणत्याही मंदिराच्या न्यासाला आहे. मात्र, अशी व्यक्ती पौरोहित्य करण्यास ज्ञानाच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे. नित्य आणि नैमित्तिक पूजापाठ योग्य प्रकारे आणि परंपरेनुसार झाले पाहिजेत, ही एकच अट आहे. अन्य निकष असू शकत नाही, असे न्या. व्यंकटेश यांनी स्पष्ट केले. सालेम येथील मुथू सुब्रमणिया गुरुकाल यांनी या संबंधातील याचिका सादर केली होती. 2018 च्या सरकारी सूचनेनुसार अर्चाकार किंवा स्थानिकम या पदासाठी कोणत्याही जातीची पात्र व्यक्ती करु शकते. या सूचनेला याचिकेत आव्हान देण्यात आले होते. हा आदेश मंदिराच्या पौरोहित्य परंपरेच्या विरोधात आहे. पौरोहित्याचा अधिकार वंशपरंपरागत असून त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे सूचना रद्द करावी, अशी मागणी याचिकेत होती. न्यायालयाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुरोहितपदासाठी नव्याने आवेदने मागविण्याची सूचना केली. याचिकाकर्ताही आवेदनपत्र सादर करुन या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो. पुरोहिताची निवड करताना त्याच्या ज्ञानपात्रतेची कठोर परीक्षा घेणे आवश्यक आहे, असाही आदेश देण्यात आला आहे.









