शेफर्डस् इंडियाच्या नवव्या राष्ट्रीय महामेळाव्याचे उद्घाटन
बेळगाव : देशातील प्रत्येक राज्यात धनगर समाज वास्तव्यास आहे. घटनेने दिलेले अधिकार व हक्कांसाठी संघटित होऊन लढा देणे ही चांगली बाब आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी जातीचे मेळावे भरविणे चुकीचे नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. येथील जिल्हा क्रीडांगणावर शेफर्डस् इंडियाच्या नवव्या राष्ट्रीय महामेळाव्याचे उद्घाटन करुन ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पालकमंत्री व बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, नगरविकास मंत्री सुरेश भैरती, हरियाणाचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार राजू सेठ, आमदार अशोक पट्टण, लक्ष्मणराव चिंगळे, डॉ. राजेंद्र सन्नक्की, निरंजनानंद स्वामी, शिवानंदपुरी स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारकडे प्रस्ताव
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणाऱ्या धनगर समाजातील नागरिकांचा वेगवेगळ्या जातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. काही जण अनुसुचित जातीमध्ये तर काही जण अनुसुचित जमातीमध्ये आहेत. धनगर समाजाचा अनुसुचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो प्रस्ताव आपण मान्य करुन आणू, असे आश्वासन सिध्दरामय्या यांनी दिले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशामध्ये हा समाज मोठ्या संख्येने असला तरी संघटीत नसल्याने प्रत्येक क्षेत्रात समाजाची पिछेहाट झाली आहे. संघटीत होवून प्रबळ नेतृत्व निर्माण करणे आवश्यक आहे. आपल्या हक्कांसाठी असे मेळावे भरविणे गैर नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरी देखील असमानता कायम आहे. जाती व्यवस्था आहे. जातीजातींमध्ये भेदभाव निर्माण केला जात आहे. राज्यामध्ये अनेक जाती, धर्मांची मठ आहेत. मात्र आपण कोणत्याच प्रकारची जातीयता करणार नाही. जात, पात आपण मानत नाही. प्रत्येकाला माणुस म्हणून वागणूक द्यावी तरच मठांना महत्व आहे. तरच एक श्रेष्ठ राष्ट्र निर्माण होवू शकतो.
समाजातील प्रत्येक जातीय धर्मातील नागरिकांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे. आपल्या सरकारकडून राबविलेल्या योजना कोणत्या जाती, धर्मासाठी मर्यादीत नाहीत. सर्व जाती, धर्मातील लोकांच्या कल्याणासाठी आहेत. गोर-गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेवटपर्यंत झटत राहणार. गोर-गरीबांचे जीवनमान उंचविण्यासाठी अशा विकासाभिमुख योजना राबविणार, असे त्यांनी सांगितले. आपण कोणत्या जाती, धर्मामध्ये संघर्ष निर्माण केला नाही. सर्वांना एकत्र आणून विकास साधण्याचा प्रयत्न केलाआहे आणि ते प्रयत्न आपण यापुढेही सुरूच ठेवणार आहोत. मात्र काही जणांना हे पचेना झाले आहे. विरोधकांकडून सिध्दरामय्या जातीवादी आहे, असे म्हटले जाते. आपल्या राजकीय जीवनात जातीवाद केला नाही. यापुढेही करणार नाही. जनतेने दिलेल्या आशिर्वादामुळेच राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आहे. गॅरंटी योजनांचे आमिष दाखविल्याचे सांगत आपल्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. याला न्यायालयात योग्य उत्तर देवू, असे सिध्दरामय्या यांनी स्पष्ट केले. जगद्गुरू बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार होण्यासाठी समाजातील सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा सर्वांगिण विकास होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतरही समाजातील अनेक घटकांना न्याय मिळालेला नाही. त्यांच्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार, असे त्यांनी सांगितले.
लोकसभेसाठी प्रतिनिधीत्व देण्याचा विचार
धनगर समाजाच्या समस्या निवारणासाठी हा मेळावा भरविण्यात आला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने या समाजाची ओळख आहे. कर्नाटकामध्ये या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले आहेत. 32 कोटींपेक्षा अधिक निधी देवून आर्थिकरित्या मदत करण्यात आली आहे. समाज संघटीत नसल्याने नेतृत्वाचा अभाव आहे. यासाठी समाजाला संघटीत व्हावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत धनगर समाजातील नेत्याला नेतृत्वाची संधी दिली जाणार आहे. यावर विचारमंथन सुरू असून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा पालकमंत्री व बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बोलताना म्हणाल्या, धनगर समाजाने नेहमीच आपल्याला मोलाची साथ दिली आहे. आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये त्यांना मानाचे स्थान देवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबध्द असून आपल्याकडूनही आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. पाच गॅरंटी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक जाती, धर्मातील गोर-गरीबांना न्याय देण्यात आला आहे. भविष्यातही या समाजाला न्याय मिळवून देवू, असे त्यांनी सांगितले.









