वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या हम्बुर्ग युरोपियन खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेचा कास्पर रुड आणि जर्मनीचा डॅनिल अल्टमेयर यांनी एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. मात्र ख्रिस्टेन गॅरीन आणि रशियाचा आंद्रे रुबलेव यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरुष एकेरीच्या सामन्यात नॉर्वेच्या कास्पर रुडने ख्रिस्टेन गॅरीनचा 1-6, 6-2, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. टॉप सिडेड कास्पर रुडचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना फ्रान्सच्या अर्थर फिल्सबरोबर होणार आहे. 2020 साली कास्पर रुडने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. गुरुवारी झालेल्या अन्य एका सामन्यात जर्मनीच्या डनिल अल्टमेयरने रशियाच्या आंद्रे रुबलेवचे आव्हान 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अल्टमेयरला हा सामना 75 मिनिटानंतर जिंकता आला. अल्टमेयरचा पुढील सामना झिहेनबरोबर होणार आहे. रुबलेवने गेल्या आठवड्यात बॅस्टेड टेनिस स्पर्धा जिंकली होती. पण त्याला हॅम्बुर्गच्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीतच हार पत्करावी लागली. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात झेंग झिहेनने हेनफॅनचा 4-6, 6-1, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. स्पेनच्या मिरालेसने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चिलीच्या गॅरीनचा 1-6, 6-2, 6-2 असा पराभव केला.









