कोल्हापूर :
कसिनो मध्ये पैसे घालवायचे असेल तर आता जिह्याबाहेर जायची गरज नाही. कोल्हापूरातच आता कसिनोचा सुळसुळाट झाला आहे. सांगली फाटा येथे एका म्हेव्हण पाव्हण्यांच्या हॉटेलमध्ये राजरोसपणे कसिनो सुरु असून, वडणगे येथील शेतामध्ये सांगलीतून आलेल्या काकाने कसिनो सुरु केला आहे. याच काकाने जयसिंगपूर येथेही अशाच प्रकारे कसिनो सुरु केला आहे. रात्रीच्या अंधारासोबतच दिवसाढवळ्याही हे कसिनो जोरात सुरु असून, अनेकांची पावले याकडे वळत आहेत.
गोवा येथे कसिनोमध्ये जुगारासाठी जाण्याची पद्धत आता बंद पडली आहे. कोल्हापूर जिह्यातच आता 5 ते 6 कसिनो सुरु झाले आहेत. सांगली फाटा येथे म्हेवणे पाव्हणे हॉटेलच्या नावाखाली सुरु असलेला कसिनो, सांगली येथील काकाने कोल्हापूरातील वडणग्यात सुरु केलेला कसिनो याचसोबत काकाने जयसिंगपूर नजीक एका खेडेगावामध्येही कसिनो सुरु केला आहे. लक्ष्मी टेकडी जवळ फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये, आसिफने शिरोळमधील गणेशवाडीत सुरु केलेला कसिनो याचसोबत निपाणी जवळ अर्जुनवाडी येथील कसिनो सुरु आहेत. यामुळे जिह्यात कसिनो संस्कृती रुजत आहे.
सांगलीतून काकाची एंट्री, सोबतीला सनी
सांगलीत बसून बेटींगची सुत्रे हलविणाऱ्या काकाने आता आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळविला आहे. क्रिकेट बेटींगमध्ये चांगला जम बसविल्यानंतर काकाने सनीला सोबत घेवून आता कसिनोमध्ये आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली आहे. काकाने जिह्यात दोन कसिनो उघडले असून, वडणगे आणि जयसिंगपूर परिसरात हे कसिनो सुरु आहेत. वडणगे येथील उलाढाल मोठी असल्याने याची जबाबदारी काकाने स्वत:ाकडे ठेवली आहे. तर जयसिंगपूर येथील जबाबदारी सनीकडे देण्यात आली आहे. जयसिंगपूर येथील कसिनोमध्ये 15 दिवसांपूर्वी जोरदार वाद झाला होता. कसिनोमधील प्रतिस्पर्ध्यांनी काकाच्या कसिनोमध्ये धिंगाणा घातला होता.
डबल मर्डरमधील आरोपी, बॉस,
कोल्हापूर शहरालागत एकूण तीन कसिनो सुरु आहेत. यापैकी सांगली फाटा आणि लक्ष्मी टेकडी येथील कसिनोमध्ये 6 ते 7 जणांची भागिदारी आहे. दररोज 3 ते 4 कोट रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत आहे. सांगली फाटा येथील कसिनोमध्ये दोन अजित सोबतच डबल मर्डरमधून बाहेर पडलेला काल्या यांची भागिदारी आहे. याचसोबत विक्रमनगरमधील शेंडेफळ असणारा अभिही सहभागी झाला आहे. त्यांच्यासह गुजरी आणि गांधीनगरमधील हवालाची कामे करणाऱ्या काही जणांची भागिदारी असल्याची चर्चा आहे. तर लक्ष्मी टेकडी येथील कसिनोला एका एका बॉसने आर्थिक पाठबळ दिले आहे. त्याचा यामध्ये मोठा वाटा आहे. यासह अन्य एक सराईत गुंड, बॉबी नावाचा बेकरी मालकही यामध्ये उतरला आहे.
सावकारांचीही व्यवस्था
कसिनोमध्ये पहिल्यांदा खेळल्यानंतर पैसे येतात. आणि यानंतर पैसे जावू लागतात. यामुळे पैसे मिळाल्यावर खेळणाऱ्यांची सवय वाढू लागते. यामुळे कसिनो मालकांनी कसिनोमध्ये सावकारांचीही व्यवस्थाही केली आहे. दिवसाला 10 टक्के व्याजाने कसिनोमध्ये रक्कम उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे कसिनोमध्ये हारलेले आता सावकारांच्या जाळ्यातही सापडू लागले आहेत.
गोव्याच्या धर्तीवर सर्व टेबल
गोव्यात असणाऱ्या बड्या कसिनोच्या धर्तीवर कोल्हापूरात कसिनोची उभारणी करण्यात आली आहे. गोव्याच्या कसिनोत असणारे सर्व टेबल कोल्हापूरात मांडण्यात आले आहेत. यामध्ये रोलेट 65 घर, बॉल टाकून खेळणे, नंबर वर पैसे लावणे 100 आणि 500, तीन पाणी, पट्टा 100 ला 100, अंदर बाहेर, काळ पिवळं अशी वेगवेगळी टेबल मांडण्यात आली आहेत. गोव्यातील कसिनोमध्ये एक वर्षानंतर सर्व टेबल बदलण्यात येतात, हीच जुनी टेबल कोल्हापूरातील काकाने गोव्यातून आणल्याचीही चर्चा आहे. गोव्याच्या धर्तीवर कॉईनही तयार करुन घेण्यात आले आहेत.








