वन विकास महामंडळ अध्यक्ष डॉ. देविया राणे यांची माहिती शनिवारी पणजीत ’काजू महोत्सव’

पणजी : नारळानंतर काजू हे गोव्याचे वैशिठ्यापूर्ण पीक असून त्याला जागतिक ओळख प्राप्त करून देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचाच भाग म्हणून येत्या दि 15 रोजी आगळ्या वेगळ्या ’काजू महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव यशस्वी झाल्यास पुढील वर्षापासून तो वार्षिक महोत्सव म्हणून आयोजित करण्याचा विचार आहे, अशी माहिती गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे यांनी दिली. कांपाल येथील दयानंद बांदोडकर मैदानावर दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान काजू बद्दलची ’अथ’ पासून ’इति’ पर्यंत सर्व माहिती विविध पेव्हिलियन्सच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याशिवाय या व्यवसायातील विद्यमान शेतकऱ्यांसह नव्याने हा व्यवसाय स्वीकारण्याच इच्छुक असलेल्यांनाही पिकासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यासाठी देशातील विविध नामांकित कृषी विद्यापीठे आणि तत्सम संस्थांचे तज्ञ उपस्थित राहणार आहेत, असे डॉ. राणे यांनी सांगितले. काजू उत्पादनामुळे गोव्याला राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर स्वतंत्र ओळख प्राप्त झालेली आहे. त्यात काजूगर आणि मुट्ट्यांपासून तयार केलेले निरो, हुर्राक, फेणी यासारखी पेये लोकप्रिय आहेत. देशात प्रथमच एका स्थानिक उत्पादनाला जीआय नामांकन प्राप्त झाले आहे ते म्हणजे गोव्याची फेणी. तिला जागतिक पातळीवर नेण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात आम्ही अनेक देशांशी पत्रव्यवहारही सुरू केला आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.
कित्येक पिढ्यांपासून गोव्यात काजू व्यवसाय चालतो. त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे त्याचा फायदाही महिलांनाच मिळाला पाहिजे या उद्देशाने महोत्सवात जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. विविध महिला स्वयंसाहाय्य गटांतर्फे उत्पादित खास गोमंतकीय पद्धतीचे खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचेही प्रयत्न होतील. अशा काही महिला गटांकडून नारळाच्या करवंटीपासून तयार केलेले वैशिष्ठ्यापूर्ण कप यापुढे दाऊच्या दुकानात दिसणार आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकावर चहासाठी मातीचे कप (कुल्हड) वापरण्याची कल्पना तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी सत्यात आणली होती. त्याच धर्तीवर हे करवंटीपासून बनविलेले कप असतील, असे डॉ. राणे यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यातील कुंभारकाम करणाऱ्या कलाकारांसाठीही खास दालने प्रदर्शनात असतील. तसेच ’रागास ते रिचीस’ व ’शोर पोलीस’ या बँड्सचे सादरीकरण, गोव्याच्या नाइटिंगेल लोर्ना, पार्श्वगायक स्टेबिन बेन आणि वर्मा डी’मेलो यांचा फॅशन शो यांचेही सादरीकरण होणार आहे. ’सन, सँड अँड सी’ एवढ्यापुरतीच मर्यादीत असलेली गोव्याची ओळख अधिक व्यापक करताना या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यात पर्यटन उद्दोगालाही चालना देण्याचे प्रयत्न होतील. हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात आल्यास पर्यटकांनाही त्याकडे आकर्षित करता येईल, असेही राणे यांनी सांगितले. दि. 15 रोजी सायंकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, वनमंत्री विश्वजित राणे, कृषीमंत्री रवी नाईक, साबांखा मंत्री नीलेश काब्राल, रोहन खंवटे, गोविंद गावडे, बाबूश मोन्सेरात, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, जीटीडीसीचे अध्यक्ष गणेश गावकर, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. राजीव कुमार गुप्ता आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित राहणार आहेत.









