आगीत जवळपास दहा एकरमध्ये असलेली काजूची झाडे खाक : पाच लाखांचे नुकसान
वार्ताहर/उचगाव
उचगाव-कोवाड मार्गावरील बसुर्ते फाट्यानजीक असलेल्या काजू बागेला या ठिकाणी असलेल्या विद्युतभारित ट्रान्स्फॉर्मर वाहिन्यातून ठिणग्या पडून संपूर्ण काजू बागच पेटल्याने या आगीत जवळपास दहा एकर जमिनीमध्ये असलेली काजूची झाडे जळून खाक झाली. यामध्ये जवळपास बागायतदार मालकांना पाच लाखाचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला घडली. या घटनेने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, बसुर्ते फाट्यानजीक बसुर्ते-उचगाव या गावातील नागरिकांच्या काजू-आंब्याच्या बागा आहेत. यामध्ये बसुर्ते गावातील लक्ष्मण मऱ्याप्पा मेलगे, संजय मऱ्याप्पा मेलगे, अक्षय भरमा मेलगे, तसेच उचगावमधील मायकल अंकल फर्नांडिस यांच्या काजूच्या बागा आहेत. सध्या या काजूच्या बागेमध्ये झाडांना मोठ्या प्रमाणात काजूचा बहर आला असून, अनेक झाडांना काजूलाही प्रारंभ झाला होता. मात्र सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला या काजू बागेनजीकच असलेल्या विद्युतभारित ट्रान्स्फॉर्मरमधून ठिणग्या पडून काजू बागेतील पालापाचोळ्याला आग लागून संपूर्ण बागच पेटून खाक झाली आहे.
परिणामी या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जवळपास दहा एकर जागेमध्ये शेकडो काजूची झाडे आहेत. ही संपूर्ण झाडे आगीत खाक झाली आहेत. तसेच उचगाव-कोवाड या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली काही झाडेही या आगीत जळून खाक झाली आहेत. सदर आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी बरेच कष्ट घेतले. मात्र आग आटोक्यात आली नाही. तसेच अग्निशमन दलाचे वाहन झाडांमुळे बागेपर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. यामुळे ही संपूर्ण काजू बागच जळून खाक झाली आहे.
नुकसानभरपाईची मागणी
या घटनेने बसुर्ते, उचगाव परिसरातील बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेस्कॉमने याची तातडीने दखल घेऊन नुकसान झालेल्या बागायतदार शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.









